Friday, December 27, 2024

/

वडगाव-यरमाळ रस्त्यावर बसफेऱ्या वाढवण्याची मागणी

 belgaum

बेळगाव लाईव्ह :शेतात कामासाठी जाणाऱ्या शेतकरी महिलांच्या सोयीसाठी परिवहन मंडळाने वडगाव -यरमाळ रस्त्यावरील बसफेऱ्यांमध्ये वाढ करावी, अशी मागणी संबंधित महिलांच्यावतीने बेळगाव तालूका रयत संघटनेने केली आहे.

वडगावपासून बळ्ळारी नाला अलिकडे वडगाव आणि पलिकडे शहापूर, वडगाव, धामणे, येळ्ळूर, मासगौंडहट्टी अशी हजारो एकर कृषी जमीन आहे. वडगाव, शहापूर शिवारातील शेतजमीन ही शहरी भागातील शेतकऱ्यांची आहे. तिथे बारमाही शेतकरी व महिला शेतीसाठी जात असतात.

कारण बळ्ळारी नाल्यापूढे यरमाळ रस्त्याच्या दोन्ही बाजूला जवळपास 800/850 एकर शहापूर शिवार आहे. आधी शेतकरी बैलगाडी घेऊन जातानां त्यातून महिलाही जायच्या. आता बैलगाड्या कमी झाल्याने शहापूर, वडगाव भागातील अनेक महिला चालत जाऊन आपली शेतीची कामं करतात.

खरीप हंगामात महिलांचीच जास्त कामं असतात. पावसाळ्यात तर दोन -तीनवेळा भांगलण करावी लागल्यात असल्याने महिला गटागटाने चालत जात असतानां दिसतात. कारण रिक्षाने जायच म्हंटल्यास जाता -येता प्रत्येकी 40/50 रु मोजावे लागतात.

अतिवृष्टीने पीकं गेल्याने शेतकरी मेटाकुटीस आले असलेतरी हा खर्च करावाच लागतो. तरच शेती स्वच्छ राहते. त्यात सरकारची मदत म्हणजे धन्यास कण्या,चोरास मलिदा अशी असते. खऱ्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळायची सोडून भलत्यालाच भरपाई मिळत असल्याने अनेक शेतकरी सरकारला दुषण देत असतात. तेंव्हा सरकारने बांधावर येऊन शेतकऱ्यांना भरपाई दिल्यास त्यानां समाधान वाटेल आणि थोडा भांगलणीचा खर्चतरी भागवता येईल. कारण या महागाईत शेतकऱ्यांना शेती करणे जिकेरीचे होऊन बसले आहे.

शेतकऱ्यांची ही परिस्थिती लक्षात घेऊन बेळगाव बस डेपोच्या संबंधित अधिकाऱ्यांनी वडगाव -यरमाळ रस्त्यावर मासगौंडहट्टीची जनता व विद्यार्थी वर्गासाठी त्यांच्या विनंतीनुसार सकाळी व संध्याकाळी बस सोडली आहे. तशीच सकाळी 10.30 ते 11 वा., दुपारी 2 वा. आणि संध्याकाळी 6 ते 6.30 वाजता अशा बसफेऱ्या वाढवून शेतकऱ्यांचा खर्च कमी करावा, अशी शेतकरी व महिलावर्गाची सरकार तसेच संबंधित परिवहन खात्याकडे विनंती वजा मागणी आहे.

अन्यथा येत्या काळात वरिष्ठ परिवहन अधिकाऱ्यांच्या कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन देण्याची तयारी शहापूर, वडगाव व इतर भागातील शेतकरी व महिला करत आहेत. तेंव्हा परिवहन खात्याने शेतकऱ्यांप्रती आत्मियता दाखवत वडगाव-यरमाळ रस्त्यावर बसफेऱ्या वाढवून दिलासा द्यावा, अशी बेळगाव तालूका रयत संघटना तसेच परिसरातील शेतकरी महिलांची मागणी आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.