Saturday, November 30, 2024

/

प्रलंबित उद्घाटन : बेळगाव सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल कार्यरत होण्याच्या प्रतीक्षेत

 belgaum

बेळगाव लाईव्ह :बहुप्रतीक्षित बेळगाव सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल लवकरच सुरू होणार असल्याची घोषणा सार्वजनिक बांधकाम आणि जिल्हा पालक मंत्री सतीश जारकीहोळी यांनी केली आहे.

हॉस्पिटल इमारत डिसेंबर 2022 मध्ये पूर्ण झाली असली तरी कर्मचारी नियुक्ती आणि आवश्यक उपकरणे मिळण्यास विलंब झाल्यामुळे रुग्णालय अद्याप सुरू झालेले नाही. वित्त विभागाने आऊटसोर्सिंग तत्त्वावर कर्मचारी नियुक्त करण्याच्या योजनेला मंजुरी दिली असून यापुढे कोणताही विलंब होणार नाही, अशी खात्री मंत्री जारकीहोळी यांनी दिली.

बीम्स सिव्हिल हॉस्पिटल परिसरात 140 कोटी रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे उद्घाटन तांत्रिक कारणांमुळे पुढे ढकलण्यात आले आहे. सदर प्रकल्पावर 2019 मध्ये काम सुरू झाले आणि एकदा ही सुविधा उपलब्ध झाल्यानंतर स्थानिक जनतेला त्याचा मोठा फायदा होईल अशी अपेक्षा आहे.

बेळगाव सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलची इमारत डिसेंबर 2022 पासून तयार आहे. तथापि उपकरणे आणि मनुष्यबळासाठी अनुदानाच्या कमतरतेमुळे रुग्णालयाचे कामकाज सुरू झालेले नाही. सदर चार मजली हॉस्पिटलमध्ये पुढील प्रमाणे अनेक विशेष विभाग असतील : पहिल्या मजल्यावर न्यूरोलॉजी, न्यूरो सर्जरी, प्लास्टिक सर्जरी आणि एंडोक्राइनोलॉजी; दुसऱ्या मजल्यावर गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी, नेफ्रोलॉजी आणि सर्जिकल गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी; तिसऱ्या मजल्यावर व्हीआयपी आणि जनरल वॉर्ड; तर सर्वात वरच्या चौथ्या मजल्यावर ऑपरेशन थिएटर्स.Multi special hospital

पालक मंत्री सतीश जारकीहोळी यांनी खासगी हॉस्पिटल लॉबीच्या दबावामुळे प्रकल्पाला विलंब होत असल्याच्या अफवा फेटाळून लावत त्या निराधार असल्याचे सांगितले. बेळगाव येथे लवकरच आणखी एक सरकारी कर्करोग रुग्णालय बांधण्याची योजना असल्याची माहितीही त्यांनी दिली.

नवीन सुविधेच उद्देश केवळ बेळगाव जिल्ह्यातील रहिवाशांनाच नव्हे तर गोवा आणि महाराष्ट्रासारख्या शेजारील राज्यांनाही उच्च दर्जाची आरोग्य सेवा प्रदान करणे हा आहे. ज्यामुळे या प्रदेशातील आरोग्यसेवा पायाभूत सुविधांमध्ये लक्षणीय वाढ होईल, असेही मंत्री जारकीहोळी यांनी स्पष्ट केले.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.