बेळगाव लाईव्ह :टिळकवाडी येथील लेले ग्राउंड अर्थात सुभाषचंद्र बोस मैदानावरील हॅलोजन दिव्यांच्या खांबांकडे महापालिकेने गांभीर्याने लक्ष देऊन खांबांचे धोकादायकरित्या खुल्या असलेल्या स्विच बॉक्सना तात्काळ झाकणं बसवावीत. त्याचप्रमाणे प्रशासनाने या मैदानावरील अन्य समस्या दूर करून कांही सुविधा उपलब्ध कराव्यात, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते संतोष दरेकर आणि मैदानाचा व्यायामासाठी लाभ घेणाऱ्या नागरिकांनी केली आहे.
बेळगाव शहरातील सर्वात जुन्या अशा मोजक्या मैदानापैकी टिळकवाडी येथील सुभाषचंद्र बोस मैदान हे एक आहे. भरवस्तीत असलेल्या या प्रशस्त मैदानाचा मुले आणि युवकांकडून क्रिकेट, फुटबॉल, हॉकी वगैरे विविध खेळ खेळण्यासाठी, तसेच परिसरातील नागरिकांकडून मॉर्निंग, इव्हनिंग वॉक यासारख्या व्यायामांसाठी वापर केला जातो. अलीकडच्या काळात महापालिकेने या आवाराची संरक्षण जाळी बसवून हॅलोजन दिवे बसविणे, प्रेक्षक गॅलरी उभारणे अशा काही सुधारणा केल्या आहेत. मात्र या सुधारणा करण्यात आल्यानंतर त्यांच्या देखभालीकडे, एकंदर मैदानाच्या देखभालीकडे दुर्लक्ष करण्यात आल्यामुळे खेळाडू आणि नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत असते .
सध्या लेले ग्राउंड या मैदानावर जे हॅलोजन दिव्यांचे खांब आहेत त्यांची स्विच कव्हर्स गहाळ झाली आहेत. त्यामुळे खांबातील जिवंत विजेच्या तारा धोकादायकरित्या उघड्या पडल्या आहेत. सदर मैदानावर लहान -मोठी मुले खेळायला येत असतात. या पावसाळ्यात खांबाचे लाईट स्विच ऑन असताना ओल्या शरीराने मुलांचा नकळत खुल्या स्विचच्या ठिकाणी स्पर्श झाल्यास त्यांना शॉक लागू शकतो. लेले ग्राउंडवरील जवळपास 8 ते 9 खांबांच्या स्विच बॉक्सचे सुरक्षा कवच गायब आहे. परिणामी शॉक लागून एखादी दुर्घटना घडण्याची शक्यता बळावली असून याकडे गांभीर्याने लक्ष देऊन या मैदानावरील विजेच्या खांबांचे स्विच बॉक्स झाकण तात्काळ बसविण्यात यावे.
सदर मैदानावर खेळण्यास अथवा व्यायामासाठी येणाऱ्या मुला-मुलींसाठी रेस्ट रूम आणि चेंजिंग रूमची गरज आहे. या मैदानावर एका बाजूला लहान मुलांसाठी खेळाचे उद्यान बनवण्यात आले आहे. घसरगुंडी वगैरे खेळ असलेल्या या उद्यानाची देखभाल आवश्यक आहे. तसेच तेथे पुष्कळ गवत व झुडपे उगवली असून जी साफ करणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे मैदानावरील प्रेक्षक गॅलरीला छताची गरज आहे. त्यामुळे येथे स्पर्धा आयोजित करणाऱ्या आयोजकांचे पेंडॉल भाड्याने आणण्यासाठीचे पैसे वाचतील. कारण दरवेळी त्यांना मैदानाचे भाडे आणि पेंडॉलच्या खर्चाचे ओझे उचलावे लागत असते. प्रेक्षक गॅलरीच्या पायऱ्यांमुळे मागील बाजूस निर्माण झालेल्या पोकळीतील जागेचा शटर बसवून छोट्या दुकानांसाठी वापर केला जाऊ शकतो.
यातून महापालिकेला वार्षिक महसूल मिळून मैदानासाठी केलेली गुंतवणूक परत मिळवता येते. ही छोटी दुकाने किरकोळ भाजीपाला विक्रेते किंवा खेळाच्या साहित्याच्या दुकानांसाठी किमान भाड्याने दिली जाऊ शकतात. निळे ग्राउंड अर्थात सुभाषचंद्र बोस मैदानासभोवती असलेल्या गटरांवर काढता येण्याजोग्या सिमेंट काँक्रीटच्या अच्छादनाची आवश्यकता आहे. जेणेकरून त्यावर दुचाकी पार्क करता येतील आणि त्यामुळे रहदारीची समस्या निर्माण होणार नाही, तरी लोकप्रतिनिधींसह महापालिका प्रशासनाने उपरोक्त बाबींचा सहानुभूतीपूर्वक विचार करून लवकरात लवकर योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी फेसबुक फ्रेंड्स सर्कलचे प्रमुख सामाजिक कार्यकर्ते संतोष दरेकर आणि परिसरातील नागरिकांनी केली आहे.