बेळगाव लाईव्ह :हिंदू धर्मात विशेष महत्त्व असणारी श्रीकृष्ण जन्माष्टमी उद्या सोमवार दि 26 ऑगस्ट रोजी तर मंगळवारी 27 रोजी गोपाळकाला म्हणजे दहीहंडी साजरी होणार असून यानिमित्ताने बाजारात श्रीकृष्णाच्या आकर्षक मूर्ती विक्रीसाठी दाखल झाल्या आहेत.
श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला रोहिणी नक्षत्रात श्रीकृष्णाचा जन्म झाला असे मानले जाते. त्यामुळे या दिवशी उपवास करून श्रीकृष्ण जन्माष्टमीचा सण साजरा केला जातो.
जन्माष्टमी दिवशी घरामध्ये बालरूपी श्रीकृष्णाची पूजा केली जाते तर दुसऱ्या दिवशी दहीहंडी फोडून गोपाळकाला साजरा केला जातो. त्या अनुषंगाने उद्या होणाऱ्या या सणानिमित्त शहरातील मंदिरांसह घरोघरी तयारीला वेग आला आहे.
शहर परिसरात विविध ठिकाणी श्रीकृष्णाच्या आकर्षक मूर्ती विक्रीसाठी उपलब्ध झाल्या आहेत. सदर मूर्ती खरेदी करण्यासाठी विक्रेत्यांकडे नागरिकांची गर्दी होताना पहावयास मिळत आहे. शहरातील विविध ठिकाणच्या मंदिरांमध्ये देखील श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या पार्श्वभूमीवर आवश्यक तयारीची लगबग सुरू झाली आहे. टिळकवाडी येथील इस्कॉनच्या राधा गोकुळानंद मंदिरामध्ये दरवर्षीप्रमाणे जन्माष्टमी निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
श्रीकृष्ण जन्मोत्सव रात्री 12 नंतर साजरा केला जाणार असून शहरात ठीकठिकाणी दहीहंडी फोडून जन्माष्टमी साजरी करण्याची तयारी सुरू झाली आहे. त्यासाठी गोविंदा पथकांकडून जय्यत तयारी करण्यात येत आहे.