बेळगाव लाईव्ह : कर्नाटकातील राजकारणासह देशपातळीवरील राजकारणात एंट्री घेतलेल्या जारकीहोळी कुटुंबाने आजवर आपले वर्चस्व जिल्ह्यावर सिद्ध केले असून आता जारकीहोळी हा एक ‘ब्रँड’ आहे असे विधान करत आपली राजकारणातील आणि विशेषतः बेळगाव जिल्ह्यावरील पकड किती आणि कशी मजबूत आहे हे जिल्हा पालकमंत्री आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री सतीश जारकीहोळी यांनी पुन्हा एकदा अधोरेखित केले आहे.
एका खाजगी वाहिनीला मुलाखत देताना सतीश जारकीहोळी म्हणाले, देशात ज्याप्रमाणे मोदी ब्रँड आहे तसाच आमचाही जारकीहोळी ब्रँड आहे. कोणताही पक्ष असो जारकीहोळी ब्रँड हा निरंतर असेल…
एकीकडे भाजपच्या उमेदवाराचा प्रचार आणि एकीकडे आपल्याच कुटुंबातील इतर पक्षाच्या सदस्याला मतदान करण्यासाठी याचना अशी परिस्थिती नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत निर्माण झाली. मात्र जारकीहोळी कुटुंब हे ब्रँड असून कोणत्याही पक्षात निवडणूक लढवू किंवा पद मिळवू जारकीहोळी ब्रँडचे वर्चस्व अबाधित राहील, असा विश्वास सतीश जारकीहोळी यांनी मुलाखतीदरम्यान व्यक्त केला.
नुकत्याच झालेल्या बेळगाव आणि चिकोडी लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीबाबत मत व्यक्त केले. त्यांना रमेश जारकिहोळी यांनी बेळगावात जगदिश शेट्टर यांना मतदान करण्याचे आवाहन केले. तर दुसरीकडे चिकोडी मतदारसंघात प्रियांका जारकिहोळी यांचा प्रचार केला, अशी माहिती आहे, असे सांगितले. त्यावर बोलताना जारकिहोळी यांनी मोदी जसा ब्रँड आहे, तसाच जारकिहोळी हासुद्धा ब्रँड आहे. त्यामुळे विरोधात कोणीही असले तरी लोक जारकिहोळी यांनाच मतदान करतात. त्यामुळे रमेश जारकिहोळी यांनी सांगितल्यामुळे किंवा मी सांगितल्यामुळे नव्हे तर जारकिहोळी या नावामुळे मतदान झाले आहे, असे सांगितले.
चिकोडी लोकसभा मतदारसंघात भाजप आमदार रमेश जारकिहोळी यांनी पक्षाचे उमेदवार अण्णासाहेब जोल्ले यांच्याऐवजी काँग्रेस उमेदवार प्रियांका जारकिहोळी यांचा प्रचार केल्याचा आरोप करण्यात आला होता. आता मात्र सतीश जारकिहोळी यांनी जारकिहोळी हा ब्रँड असल्याचे सांगून या विषयावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे.
विधानसभा आणि विधान परिषदेत वर्चस्व प्रस्थापित केलेल्या जारकीहोळी कुटुंबातील नवखी तरुणी खासदारपदी विराजमान झाली. भाजपमधून रमेश जारकीहोळी आणि भालचंद्र जारकीहोळी, लखन जारकीहोळी आणि काँग्रेसकडून सतीश जारकीहोळी आणि आता प्रियांका जारकीहोळी असे पाच सदस्य सध्या राजकारणात आपले वर्चस्व टिकवून आहेत.
प्रियांका जारकीहोळी खासदारपदी निवडून आल्यानंतर मुख्यमंत्री सिध्दरामय्यांनी तीन वेळा बेळगावचा दौरा केला. यावरून सिध्दरामयांच्या पाठीशी जारकीहोळी कुटुंब कशापद्धतीने उभे आहे हेच यावरून दर्शविण्यात आले, असे राजकीय जाणकारांचे मत आहे.