बेळगाव लाईव्ह :पोलीस दलाला अधिक सक्रिय व सक्षम बनवण्यासाठी बेळगाव शहर पोलीस आयुक्त याडा मार्टिन मार्बन्यांग यांनी साप्ताहिक परेड ऐवजी पोलिसांसाठी ‘वॉक अँड रन’ हा आगळा उपक्रम सुरू केला असून काल पोलीस परेड मैदानापासून सदाशिवनगर, हनुमाननगर परिसरात हा उपक्रम पार पडला.
पोलिस तंदुरुस्त सक्षम रहावेत यासाठी सोमवार व शुक्रवार असे आठवड्यातून दोन दिवस परेड घेतली जाते. तथापि अलीकडेच नव्याने शहर पोलीस आयुक्त म्हणून रुजू झालेल्या याडा मार्टिन मार्बलंग यांनी या साप्ताहिक परेडला फाटा देत ‘वॉक अँड रन’ उपक्रम सुरू केला आहे.
आठवड्यातून दोन वेळा अधिकारी व पोलिसांना घेऊन स्वतः पोलिस आयुक्त शहरातील विविध भागांचा फेरफटका मारत आहेत. वॉक अँड रन उपक्रम सुरू असतानाच एखाद्या मोकळ्या प्रशस्त जागी पोलिसांना थांबवून शारीरिक व्यायामही घेतले जात आहेत. त्यामुळे हा उपक्रम लक्षवेधी ठरत आहे.
या उपक्रमात शहरातील बहुतांश पोलिस अधिकारी व पोलिसांचा सहभाग पहावयास मिळत आहे. तंदुरुस्तीसाठी बहुतांश वरिष्ठ पोलीस अधिकारी साप्ताहिक परेडला प्राधान्य देतात. मात्र बेळगावचे पोलीस आयुक्त मार्बन्यांग यांनी चालत व धावत शहराचा फेरफटका मारण्यास प्राधान्य दिले आहे.
यामुळे पोलिसांची तंदुरुस्ती वाढण्याबरोबरच जनतेच्या समस्या जाणून घेण्यासही मदत मिळते, असे पोलीस आयुक्तांचे मत असल्याचे कळते. एकंदर वरिष्ठ अधिकारी बदलले की कांही कार्यपद्धती देखील बदलतात त्याची प्रचिती सध्या बेळगावच्या पोलीस दलाला येत आहे.