बेळगाव लाईव्ह :बेळगाव तालुका पोल्ट्री फार्मर्स असोसिएशनचे उद्घाटन आणि नूतन कार्यकारिणीचा सत्कार असा संयुक्त सोहळा येत्या बुधवार दि. 14 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता आयोजित करण्यात आला आहे. यावेळी कुक्कुटपालन व्यवसाय संदर्भात मार्गदर्शन व विविध सरकारी योजनांबाबत मार्गदर्शनही केले जाणार आहे.
राकसकोप रोड, बेळगुंदी येथील श्री दुर्गामाता मंगल कार्यालयामध्ये होणाऱ्या या सोहळ्याचे अध्यक्षस्थान बेळगाव तालुका पोल्ट्री फार्मर्स असोसिएशनचे अध्यक्ष ब्रह्मानंद गवस हे भूषवणार आहेत.
यावेळी उद्घाटक म्हणून माजी मुख्यमंत्री व बेळगावचे विद्यमान खासदार जगदीश शेट्टर आणि पोल्ट्री जनक बी. व्ही. राव उपस्थित राहणार आहेत. याखेरीज प्रमुख पाहुणे म्हणून माजी विधान परिषद सदस्य महांतेश कवटगीमठ, माथाडी कामगार मुंबईचे अध्यक्ष शिवाजीराव पाटील, माजी महापौर शिवाजी सुंठकर, क्वालिटी ॲनिमल फीड्सचे संचालक एस. एस. देशपांडे, हिरण्यकेशी साखर कारखान्याचे संचालक पी. एम. देशपांडे, सगुना बेळगाव शाखा व्यवस्थापक अजया एम., आयबी व्यवस्थापक विठ्ठल खंडोजी, पशुवैद्य डॉ. प्रतापराव हन्नुरकर, एस. एन. पोल्ट्रीचे संचालक नागेश पारवाडकर, बेळगावचे हॅस्कॉम अधीक्षक प्रवीणकुमार चिकार्डे, कॉलिटी ॲनिमल फीड्सचे अध्यक्ष डॉ मधुकर पवार, खानापूर तालुका पोल्ट्री असो.चे अध्यक्ष जी. ए. गंगाधर,
चंदगड तालुका पोल्ट्री असो.चे अध्यक्ष जयवंत पाटील, उपाध्यक्ष शिवाजी पाटील आणि एस. एन. पोल्ट्रीचे डाॅ. मनोज पाटील हे हजर राहणार आहेत. याखेरीज प्रमुख वक्ते म्हणून खानापूर तालुका पोल्ट्री असोसिएशनचे उपाध्यक्ष लक्ष्मण कसर्लेकर आणि सत्कारमूर्ती म्हणून राष्ट्रीय आदर्श सामाजिक सेवा पुरस्कार विजेते एन. के. नलवडे उपस्थित असतील.
सदर सोहळ्यात बेळगाव तालुका पोल्ट्री फार्मर्स असोसिएशनच्या उद्घाटनाबरोबरच नूतन कार्यकारिणीचा सत्कार केला जाणार आहे. त्याचप्रमाणे यावेळी कुक्कुटपालन व्यवसाय संदर्भात मार्गदर्शन व विविध सरकारी योजनांबाबत चर्चा व मार्गदर्शन होणार असून असोसिएशनच्या पुढील वाटचालीची दिशा ठरवली जाणार आहे.
तरी बेळगाव तालुक्यातील समस्त शेतकरी बंधूंनी या सोहळ्यास बहुसंख्येने उपस्थित राहून सहकार्य करावे, असे आवाहन असोसिएशनचे अध्यक्ष ब्रह्मानंद गवस, उपाध्यक्ष परशराम पाटील व सचिव कार्तिक बाचीकर यांनी केले आहे.