बेळगाव लाईव्ह : बेळगाव शहरातील आपटेकर स्पोर्ट्स फाउंडेशनतर्फे उत्तम आरोग्यासाठी प्रेरणा मिळावी या उद्देशाने आयोजित ‘बेळगाव रन -2024’ या मॅरेथॉन शर्यतीतील पुरुष आणि महिला गटाचे विजेतेपद अनुक्रमे प्रथमेश परमकर आणि शुभांगी काकतकर यांनी पटकावले. त्याचप्रमाणे अन्य विविध गटात राजू पिरन्नावर, दिव्या हेरेकर अरुण तिप्पन्नावर आणि बी. एच. वैद्य हे विजेते ठरले.
आपटेकर स्पोर्ट्स फाउंडेशनतर्फे आयोजित ‘बेळगाव रन -2024’ मॅरेथॉन शर्यत आज सकाळी उत्स्फूर्त प्रतिसादात पार पडली. शहरातील जिल्हा क्रीडांगण अर्थात नेहरू स्टेडियम येथे शर्यतीचा शुभारंभ आणि सांगता करण्यात आली.
प्रारंभी आपटेकर स्पोर्ट्स फाउंडेशनचे प्रमुख माजी मिस्टर इंडिया व रेल्वे अधिकारी सुनील आपटेकर यांनी शर्यती विषयी थोडक्यात माहिती देऊन सर्वांचे स्वागत केले. यावेळी प्रमुख पाहुणे नैऋत्य रेल्वेचे प्रमुख मुख्य कमर्शियल मॅनेजर सत्यप्रकाश शास्त्री, डॉ. रवी पाटील, डॉ. प्रसाद, बेळगावचे डीसीपी एन. निरंजन राजे अरस, जिल्हा पोलीस प्रमुख डाॅ. भीमाशंकर गुळेद आणि आंध्रा कार्गोचे चरणजीत सिंग यांच्या हस्ते ध्वज दाखवून शर्यतीचा शुभारंभ करण्यात आला याप्रसंगी एफिशियंट डेव्हलपर्सचे प्रवीण पाटील, बेळगाव बारासोसिएशनचे अध्यक्ष ॲड. एस. एस. किवडसन्नावर आदी मान्यवरांसह बहुसंख्य क्रीडाप्रेमी उपस्थित होते.
सदर मॅरेथॉन शर्यत विविध वयोगटात तसेच 10 कि.मी., 5 कि.मी. व 3 कि.मी. (फन रन) अशा श्रेणीमध्ये घेण्यात आली. या शर्यतीमध्ये बेळगाव शहर व ग्रामीण भागातील शाळा व कॉलेजेसचे विद्यार्थी -विद्यार्थिनी, सरकारी खात्यासह रेल्वे, पोलीस, लष्करी खात्यातील कर्मचारी, तसेच मंगळूर, म्हैसूर, महाराष्ट्रातील सांगली, कोल्हापूर वगैरे परगावच्या हजारो धावपटूंनी भाग घेतला होता.
सदर शर्यतीचा अंतिम निकाल (अनुक्रमे वयोगट, पहिल्या तीन क्रमांकाचे विजेते, त्यांची वेळ यानुसार) पुढील प्रमाणे आहे पुरुष विभाग : 15 ते 30 वर्षे वयोगट -प्रथमेश परमकर (00:16:37), विजय सावरकर (00:16:38), बिजेंटो खारीया (00:16:39). 31 ते 45 वयोगट -राजू पिरन्नावर (00:19:01), सुनील शिवणे (00:19:50), बाबू चौगुले (00:20:41). 46 ते 99 वर्षे वयोगट -अरुण तिप्पन्नावर (00:24:17) कल्लाप्पा तिरवीर (00:24:21) चंद्रकांत कडोलकर (00:26:43). फन रन – राजवर्धन थोरात (00:23:58), सुजित राजशेखर येळ्ळूर (00:25:01), अभिजीत सिंग (00:25:19).
महिला विभाग : 15 ते 30 वर्षे वयोगट -शुभांगी काकतकर (00:21:45), धनश्री पाटील (00:22:41), भूमी किरण बेळगावकर (00:22:51). 31 ते 45 वयोगट -दिव्या हेरेकर (00:26:33), शिवानी अनगोळकर (00:35:45), वीणा गजरे (00:38:06). 46 ते 99 वर्षे वयोगट -बी. एच. वैद्य (00:29:57) सविता शास्त्री (00:31:28), रूपा (00:38:49). फन रन -श्रेया कोलेकर (00:25:52), संध्या नाईक (00:25:59), किमया गायकवाड (00:28.07).
शर्यतीनंतर आयोजित बक्षीस वितरण समारंभात उपरोक्त प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते विजेत्या स्पर्धकांना आकर्षक रोख रकमेची पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. मॅरेथॉन मध्ये सहभागी सर्व धावपटूंना आकर्षक पदक व इव्हेंट टी-शर्ट प्रदान करण्याबरोबरच त्यांच्यासाठी नाश्ता, रूट हायड्रेशन सपोर्ट आणि वैद्यकीय सहाय्य उपलब्ध करण्यात आले होते.
विशेष म्हणजे बक्षीस वितरण समारंभाप्रसंगी शर्यतीत सहभागी ज्येष्ठ धावपटूंचा खास सत्कार करण्यात आला. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी आपटेकर स्पोर्ट्स फाऊंडेशनचे प्रमुख सुनील आपटेकर यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या सर्व सहकार्यांनी विशेष परिश्रम घेतले.