बेळगाव लाईव्ह : बलिदान आणि देशभक्तीचे प्रतीक असलेले किर्लोस्कर रोड, रामदेव गल्ली आणि कडोलकर गल्लीच्या चौकात असलेले हुतात्मा स्मारक 1948 पूर्वी आपल्या स्वातंत्र्यसैनिकांनी बांधले होते.
बेळगाव शहर आणि जिल्ह्यातील अनेकांनी ब्रिटिशांविरुद्ध भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात मोलाची भूमिका बजावली होती. त्यांच्या या योगदानाच्या सन्मानार्थ आणि भावी पिढ्यांना प्रेरणा देण्यासाठी उभारण्यात आलेले हे हुतात्मा स्मारक आपल्या भूतकाळाचे एक शक्तिशाली स्मरण म्हणून उभे आहे.
स्वातंत्र्यपूर्व काळापासून बेळगाव शहर स्वातंत्र्य लढ्यातील महत्त्वाचे केंद्र होते. 1924 मध्ये महात्मा गांधी बेळगावमध्ये नऊ दिवस राहिले. त्यावेळी अधिवेशनाच्या आयोजनासाठी कार्यकर्त्यांनी सहा महिन्यांहून अधिक काळ मेहनत घेतली होती. त्या काळात मोतीलाल नेहरू, जवाहरलाल नेहरू, लाला लजपत राय, ॲनी बेझंट, सरोजिनी नायडू, चित्तरंजनदास, पंडित मदन मोहन मालवीय, मौलाना अब्दुल कलाम आझाद, मोहम्मद अली, बाबू राजेंद्रभाई पटेल, मौलाना शौकत अली आणि इतर अनेक प्रमुख नेते बेळगावात एकत्र आले होते.
9 ऑगस्ट 1942 रोजी छेडण्यात आलेल्या भारत छोडो आंदोलनात अनेक स्थानिकांनी भाग घेतला होता. स्वातंत्र्य लढ्यात महत्त्वाचे योगदान असलेल्या गंगाधरराव देशपांडे, जीवनराव याळगी, जयदेवराव कुलकर्णी आणि श्रीराम कामत यांसारख्या प्रमुख व्यक्तींनी 1948 पूर्वी स्वखर्चाने हुतात्मा स्मारकाची उभारणी केली.
सुरुवातीला या स्मारकाची उंची कमी होती मात्र स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 1952 मध्ये स्वातंत्र्यपूर्व काळातील बेळगाव नगरपालिकेची पहिल्यांदा निवडणूक झाली. या काळात हुतात्मा स्मारकाच्या विकासासाठी अनुदान देण्यात आले. त्या अनुदानातून हुतात्मा स्मारकाचा विस्तार करण्यात आला.
आज हे हुतात्मा स्मारक केवळ ऐतिहासिक वास्तू राहिलेले नसून प्रत्येकाला आपल्या हुतात्म्यांच्या बलिदानातून शक्ती आणि उर्जा मिळवून देण्याचे आवाहन करणारा प्रेरणास्रोत बनले आहे.