बेळगाव लाईव्ह :एका महिला डॉक्टरवर निर्घृण बलात्कार करून तिची हत्या करण्याच्या कोलकाता येथे घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ पुकारण्यात आलेल्या डॉक्टरांच्या देशव्यापी ’24 तास काम बंद’ आंदोलनाला पाठिंबा दर्शवत आयएमए बेळगाव, डेंटल असोसिएशन, आयुष संघटना, अभाविप वगैरे विविध संघटनांनी आज शनिवारी सकाळी शहरात विराट मोर्चा काढून निवेदन सादर करण्याबरोबरच जोरदार निदर्शने करून परिसर दणाणून सोडला होता. आजच्या या मोर्चात शेकडो डॉक्टर सहभागी झाले होते.
कोलकाता येथील महिला डॉक्टर वरील बलात्कार व खुनाच्या घटनेच्या निषेधार्थ भारतीय वैद्यकीय संघटनेने (आयएमए) पुकारलेल्या 24 तास काम बंद आंदोलनाला आज बेळगावात वैद्यकीय व्यवसायाशी संबंधित विविध संघटनांनी संपूर्ण पाठिंबा व्यक्त केला.
यासाठी आयएमए बेळगाव शाखा, आयुष फेडरेशन ऑफ इंडिया बेळगाव शाखा, महिला डॉक्टर्स संघटना, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद यांनी आज शनिवारी सकाळी राणी कित्तूर चन्नम्मा सर्कल येथे आंदोलन छेडून कोलकाता येथील घटनेचा तीव्र निषेध केला.
यावेळी शिकाऊ डॉक्टरांनी रस्त्यावर ठिय्या आंदोलन करून कांही काळ रस्ता रोको केला. चन्नम्मा चौकातील आंदोलनानंतर जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढून निवेदन सादर करण्यात आले. सदर मोर्चात शेकडो डॉक्टर्स आणि वैद्यकीय कर्मचारी सहभागी झाले होते. त्या नराधमाला फाशीची शिक्षा द्या, सफेद कोटाला लाल होऊ देऊ नका, बऱ्या करणाऱ्या हातांना रक्तरंजित करू नका, त्या महिला डॉक्टरला न्याय मिळालाच पाहिजे, बलात्कार थांबवा, सुरक्षा नाही सेवा नाही, यासारख्या विविध आशयांचे फलक आणि भगवे ध्वज हातात धरून ‘वुई वॉन्ट जस्टीस’ सारख्या घोषणा देत निघालेला हा मोर्चा साऱ्यांचे लक्ष वेधून घेत होता.
त्याचप्रमाणे आंदोलनात सहभागी डॉक्टर्स देत असलेल्या घोषणांमुळे मोर्चाचा मार्ग आणि जिल्हाधिकारी कार्यालय आवार दणाणून गेले होते. मोर्चाची सांगता जिल्हाधिकारी कार्यालय आवारात झाल्यानंतर त्या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी निवेदनाचा स्वीकार करून योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. कोलकाता येथील घटनेस जबाबदार असलेल्यांना कठोर शासन केले जावे. त्यांना फाशीची शिक्षा दिली जावी. अत्याचार व खून झालेल्या महिला डॉक्टर आणि तिच्या कुटुंबीयांना न्याय दिला जावा. केंद्राने डॉक्टरांच्या सुरक्षेच्या दृष्टीने कडक कायदा अंमलात आणावा अशा मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आले आहेत. आजच्या डॉक्टरांच्या आंदोलनादरम्यान कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
यावेळी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना भारतीय वैद्यकीय संघटना (आयएमए) बेळगाव शाखेचे अध्यक्ष डॉ. आर. बी. अनगोळ यांनी कोलकाता येथील हॉस्पिटलमध्ये कामाच्या वेळेत एका महिला पीजी डॉक्टरवर बलात्कार करून तिचा खून करण्यात आल्याची घटना गेल्या 9 ऑगस्ट रोजी घडली. या घटनेचा मी तीव्र निषेध करतो. खुनाच्या घटनेनंतर संबंधित आरोपींनी 14 ऑगस्ट रोजी पुन्हा हॉस्पिटलमध्ये दंगा घातला, मात्र त्याकडेही दुर्लक्ष करण्यात आले. असे जर घडणार असेल तर डॉक्टर्स विशेष करून महिला डॉक्टर्स आपले कर्तव्य कसे पार पाडणार? त्यामुळे अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी कठोर अशा एका केंद्रीय कायद्याची गरज आहे.
सर्व डॉक्टरांना सुरक्षा पुरवली गेली पाहिजे अन्यथा त्यांना हॉस्पिटलमध्ये काम करणे अशक्य होईल. कोलकाता येथील घटना सरकारी हॉस्पिटलमध्ये घडली आहे. याच्या निषेधार्थ आयएमएने आज सकाळपासून 24 तासासाठी संपूर्ण देशात ओपीडी सेवा बंद ठेवली असली तरी आपत्कालीन सेवा सुरू आहे. आम्ही जशी समाजाची काळजी घेतो तशी सरकारने आमची देखील काळजी घेतली पाहिजे. डॉक्टरांसाठी सुरक्षित वातावरण नसेल तर ते आपले काम व्यवस्थित करू शकणार नाहीत. या संदर्भात आम्ही आज निवेदन देत असून आमच्या महिला डॉक्टरांची संघटना देखील निवेदन देणार आहे अशी माहिती देऊन कोलकाता येथील घटनेस जबाबदार असणाऱ्यांना कठोरातील कठोर शिक्षा केली जावी. तसेच भविष्यात अशा घटना घडविण्यात यासाठी केंद्र सरकारने कडक कायदा करावा, ही आमची प्रमुख मागणी आहे असे डॉ. अनगोळ यांनी सांगितले.
आयुष फेडरेशन ऑफ इंडिया बेळगाव शाखेचे अध्यक्ष डाॅ. पद्मराज पाटील यांनी यावेळी बोलताना आम्ही आमची ओपीडी सेवा बंद ठेवून या ठिकाणी कोलकाता येतील घटनेचा निषेध करण्यासाठी जमलो आहोत असे सांगितले. भारत सरकार मार्फत त्या मयत महिला डॉक्टरला न्याय दिला जावा. तसेच बलात्कार करून तिचा खून करणाऱ्यांना कठोर शासन केले जावे. आजच्या घडीला डॉक्टरांची कमतरता असून समाजाला त्यांची गरज आहे. ही वस्तुस्थिती असताना डॉक्टरांवरील अन्याय अत्याचार याकडे कोणीच लक्ष देत नाही आहे. डॉक्टरांसाठी सुरक्षित वातावरण निर्माण होणे काळाची गरज आहे. महिला डॉक्टरवरील बलात्काराची ही घटना समाजाला काळीमा फासणारी आहे. महिलांना सुरक्षा नसेल तर त्यांचे जगणे कठीण होईल. उद्या मुली शिकण्यास तयार होणार नाहीत. आई -वडील आपल्या मुलींना शिकण्यासाठी किंवा नोकरीसाठी पाठवणार नाहीत. वैद्यकीय क्षेत्रातील महिलांनी आता हातात इंजेक्शन ऐवजी राणी चन्नम्मा, राजमाता जिजाऊ यांच्याप्रमाणे हातात तलवार घ्यायची की काय? अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. सरकार आणि पोलीस प्रशासनाने जर आम्हा डॉक्टरांसाठी सुरक्षित वातावरण निर्माण केले नाही तर येत्या काळात डॉक्टरांना सुद्धा स्वतः सोबत शस्त्र बाळगावी लागतील असे सांगून केंद्र सरकारने लवकरात लवकर त्या दुर्दैवी महिला डॉक्टरसह तिच्या कुटुंबीयांना न्याय द्यावा, अशी मागणी डॉ. पद्मराज पाटील यांनी केली.
युवा डॉक्टर भूमी रमेश भोसले हिने “घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला, स्त्री शिवाय उत्पत्ती नाही मनुष्याच्या जातीला” असे सांगून यासाठी स्त्री हत्या थांबवा आणि भारतीय संस्कृती टिकवा असे आवाहन केले. तसेच त्या नराधमाला फाशीची शिक्षा ही झालीच पाहिजे किंवा त्याला आमच्या ताब्यात द्या आम्ही त्याला शिक्षा देऊ, असे मत व्यक्त केले.
संबंधित नराधमाला फक्त फाशी देऊन काहीच होणार नाही, त्याला जनतेच्या हातात दिला पाहिजे. त्या महिला डॉक्टरला जितका त्रास आणि यातना झाल्या तितका त्रास व यातना त्या नराधमाला देखील झाल्या पाहिजेत. तरच भविष्यात त्याच्याप्रमाणे कृत्य करण्यास इतर कोणीही धजावणार नाही. तुम्ही मेणबत्ती पेटवा, मोर्चे काढा, निदर्शने करा मात्र याच्याने कांहीच होणार नाही. पैशाच्या जोरावर गुन्हेगारांना पाठीशी घालण्याची आपल्या देशातील वाईट प्रवृत्ती बंद झाली पाहिजे. यामुळे गजाआड झालेले गुन्हेगार पुन्हा उजळ माथ्याने समाजात वावरू लागतात. असे झाले तर अन्यायग्रस्तांना न्याय कसा मिळणार? स्त्रियांवर अत्याचार करणाऱ्यांना सरकारने नारी शक्तीच्या ताब्यात दिला पाहिजे असे संतप्त मत अन्य एका युवा महिला डॉक्टरने व्यक्त केले.