बेळगाव लाईव्ह : मागील वर्षी पावसाने दिलेली हुलकावणी यंदा मात्र भरून निघाली असून जिल्ह्यात १ जून ते ४ ऑगस्ट या कालावधीत ५८५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले असून, शेतजमिनीत पुराच्या पाण्यामुळे फटका बसला आहे. याशिवाय यंदा जलाशय परिसरात अनेक ठिकाणी झालेल्या दुर्घटनेत कित्येकांना आपला जीवदेखील गमावण्याची वेळ आली आहे.
जिल्ह्यात 1 जून ते 4 ऑगस्टपर्यंत 361 मि. मी. पावसाची अपेक्षा होती. मात्र प्रत्यक्षात 585 मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यात पावसाचा जोर कायम असून गेल्या चार दिवसांत 38.2 मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यामध्ये होत असलेल्या पावसाने अनेक घरांची पडझड झाली आहे तर जून 1 पासून आजपर्यंत 6 जणांचा मृत्यू झाला आहे. बेळगाव तालुक्यात 2, मुडलगी, चिकोडी, रायबाग, निपाणी या तालुक्यांमध्ये प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला आहे. तर 11 प्राण्यांचा बळी गेला आहे.
गेल्या 24 तासांमध्ये जिल्ह्यात 48 घरांची पडझड झाली असून सर्वाधिक खानापूर तालुक्यात 39 घरे कोसळली आहेत. तर जिल्ह्यामध्ये 950 घरांची पडझड झाली आहे.जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर कायम असून जिल्ह्यातील कृष्णा, मलप्रभा, घटप्रभा नद्यांच्या पाणीपातळीत कमालीची वाढ असून काही अंशी पाणीपातळी घटली असली तरी जिल्ह्यात अपेक्षेपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील पुलांवरील पाणी कमी झाले आहे. सध्या 38 पूल पाण्याखाली आहेत.
जिल्ह्यात पावसाचा जोर कायम असल्याने प्रशासनाकडून नागरिकांना खबरदारी घेण्याची सूचना करण्यात येत आहे. पाणी आलेल्या पुलांवर वाहतुकीला निर्बंध घालण्यात आले आहेत. ठिकठिकाणी बॅरिकेड्स लावून वाहतुकीसाठी मार्ग बंद करण्यात आले आहेत. प्रवासी स्थळांवर येणाऱ्या प्रवाशांच्या सुरक्षेच्यादृष्टीने पोलिसांकडून खबरदारी घेण्यात आली आहे. धोक्याच्या ठिकाणी जाण्यापासून रोखण्यात येत आहे. होमगार्ड व पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. नदीकाठासह इतर परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पिकांना फटका बसला आहे. अनेक पिके पाण्याखाली गेली आहेत. 10 जिल्ह्यांमध्ये 41,700 हेक्टर पिके पाण्याखाली गेली असून 372.31 हेक्टर क्षेत्रातील बागायत पिकांचे नुकसान झाले आहे.
अथणी, गोकाक, कागवाड, चिकोडी, निपाणी, रायबाग, मुडलगी या तालुक्यातील 34 गावांमध्ये पुराचे पाणी शिरले आहे. पुराचा धोका लक्षात घेत सदर गावांमधील नागरिकांचे काळजी केंद्रांमध्ये स्थलांतर करण्यात आले आहे. 46 गावांमधील 4905 कुटुंबांनी काळजी केंद्र व नातेवाईकांच्या घरांमध्ये आसरा घेतला आहे.