बेळगाव लाईव्ह :प्लास्टिक ध्वजांच्या माध्यमातून राष्ट्रध्वजाचा जो अपमान होतो तो रोखण्यासाठी येत्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने ‘राष्ट्रध्वजाचा सन्मान राखा’ हा उपक्रम राबवावा. त्याअंतर्गत प्रामुख्याने प्लास्टिक राष्ट्रध्वजांच्या विक्रीवर बंदी घालावी, अशी मागणी हिंदू जनजागृती समिती बेळगाव शाखेने एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
हिंदू जनजागृती समिती बेळगावचे प्रमुख सुधीर हेरेकर व मारुती सुतार यांच्या नेतृत्वाखाली उपरोक्त मागणीचे निवेदन आज सोमवारी सकाळी जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले. अप्पर जिल्हाधिकारी विजयकुमार होनकेरी यांनी निवेदनाचा स्वीकार करून योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.
राष्ट्रध्वज म्हणजे राष्ट्राची अस्मिता असते. 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी या दिवशी राष्ट्रध्वज मोठ्या अभिमानाने फडकवले जातात. मात्र प्लास्टिकच्या स्वरूपातील राष्ट्रध्वज त्याच दिवशी रस्त्यावर, कचरापेटीत, गटारासह अन्यत्र फाटलेल्या अवस्थेत पडलेले आढळतात.
प्लास्टिकचे असल्यामुळे या राष्ट्रध्वजांची विटंबना अनेक दिवस पहावी लागते. त्यामुळे स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने केल्या जाणाऱ्या प्लास्टिक राष्ट्रध्वजांच्या विक्रीवर बंदी घालण्यात यावी. तसेच प्लास्टिक राष्ट्रध्वजांची विक्री करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जावी, अशा आशयाचा तपशील जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आलेल्या निवेदनात नमूद आहे.
यावेळी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना हिंदू जनजागृती समिती बेळगावचे पदाधिकारी मारुती सुतार म्हणाले की, दरवर्षी आम्ही हिंदू जनजागरण समितीच्या वतीने 15 ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी आपल्या तिरंगा राष्ट्रध्वजाचा अवमान होऊ नये यासाठी प्रशासनाला निवेदन सादर करत असतो. त्यानुसार आज आम्ही तसे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले आहे.
स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजांची जी विक्री केली जाते त्यावर पूर्णपणे बंदी घातली गेली पाहिजे. कारण स्वातंत्र्य दिन साजरा केल्यानंतर हे प्लास्टिकचे ध्वज फेकून देण्याद्वारे राष्ट्रध्वजाचा सन्मान राखला जात नाही. स्वातंत्र्य दिनानंतर अनेक ठिकाणी हे ध्वज अवमानकारक स्थितीत पडलेले दिसून येतात. या पद्धतीने राष्ट्रध्वजाचा अवमान करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जावी आणि प्लास्टिकच्या राष्ट्रध्वज विक्रीवर संपूर्ण बंदी आणावी अशी मागणी आम्ही निवेदनाद्वारे केली आहे अशी माहिती देऊन बेळगाव शहरातील समस्त देशप्रेमी, देशभक्तांना आवाहन आहे
की आपल्या तिरंगा राष्ट्रध्वजाचा कोठेही, कोणत्याही पद्धतीने अवमान होणार नाही याची काळजी घेऊन 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन सर्वांनी आनंदाने साजरा करूया, असे आवाहन मारुती सुतार यांनी केले. याप्रसंगी सुधीर हेरेकर, मिलन पवार, सदानंद मासेकर आदीसह जनजागृती समितीचे अन्य सदस्य उपस्थित होते.