Thursday, October 31, 2024

/

बेळगावच्या क्रीडापटूंना व्यासपीठ मिळवून देण्यासाठीचं मॅरेथॉन

 belgaum

बेळगाव लाईव्ह : आपटेकर स्पोर्ट्स फाउंडेशनच्या माध्यमातून क्रीडापटू, मिस्टर इंडिया बहुमान पटकाविणारे सुनील आपटेकर यांच्या वतीने बेळगावमध्ये येत्या १८ ऑगस्ट रोजी भव्य मॅरेथॉन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार दि. १८ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी ६.०० वाजता जिल्हा क्रीडांगणावर या स्पर्धेचे उद्घाटन होणार असून तीन विभागात हि स्पर्धा विभागली आहे.

याबाबत अधिक माहिती देताना सुनील आपटेकर म्हणाले, बेळगावमध्ये अनेक प्रतिभावान क्रीडापटू आहेत. मात्र योग्य प्रशिक्षणाअभावी आजतागायत ते प्रकाशझोतात आले नाहीत. बेळगावचे नाव राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचणे गरजेचे असून यासाठी क्रीडापटूंना व्यासपीठ मिळवून देणे, संधी उपलब्ध करून देणे या उद्देशाने मॅरेथॉन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.

बेळगावमध्ये अनेकविध क्रीडा प्रकार खेळणारे क्रीडापटू असून बेळगावमध्ये या क्षेत्रात सुरु असलेल्या राजकारणामुळे अशा क्रीडापटूंना संधी मिळत नाही, हे दुर्दैव आहे. बेळगावमधील क्रीडापटूंना मॅरेथॉन स्पर्धेच्या माध्यमातून संधी मिळावी तसेच बेळगावकरांना आरोग्याचे महत्व समजावे या हेतूने सलग दुसऱ्यांदा हि स्पर्धा आयोजिण्यात येत आहे. बेळगावचे क्रीडाक्षेत्र हे अद्याप दुर्लक्षित असून राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय स्तरावर बेळगावचे नाव उंचावण्यासाठी आपण प्रयत्नशील राहणार असल्याचे ते म्हणाले.

मॅरेथॉन स्पर्धेसाठी प्रतिसाद देखील उत्तम लाभत असून हि स्पर्धा यशस्वी करण्यासाठी पोलीस आयुक्त, विविध शाळा – महाविद्यालयांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे. या स्पर्धा ३ किलोमीटर, ५ किलोमीटर आणि १० किलोमीटर अशा विभागात आयोजिण्यात आल्या असून दिव्यांग क्रीडापटूंसाठी व्हील चेअरच्या माध्यमातून मॅरेथॉन स्पर्धा आयोजिल्या आहेत. ३ किलोमीटर मॅरेथॉन धावण्यासाठी १० वर्षाखालील, ११ ते १३ वयोगटातील, १४ ते १६ वयोगटातील, आणि खुल्या गटातील स्पर्धा घेण्यात येणार आहेत. हि स्पर्धा जिल्हा क्रीडांगणापुरती मर्यादित असेल. तसेच या स्पर्धेतील प्रथम तीन विजेत्या स्पर्धकांना आकर्षक पारितोषिके देण्यात येणार आहेत.Sunil Aptekar

५ किलोमीटर मॅरेथॉन स्पर्धा जिल्हा क्रीडांगणापासून ते राणी कित्तूर चन्नम्मा चौक आणि पुन्हा जिल्हा क्रीडांगण या मार्गावर आयोजिली असून या स्पर्धेत १५-३०, ३१ – ४५, आणि ४५ वर्षाहून अधिक अशा तीन गटात स्पर्धा होणार आहे. यातील प्रथम क्रमांकाच्या विजेत्याला रुपये ४००० आणि मानचिन्ह, द्वितीय क्रमांकाच्या विजेत्याला रुपये २००० आणि मानचिन्ह तसेच तृतीय क्रमांकाच्या विजेत्याला रुपये १००० आणि मानचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे.

१० किलोमीटर मॅरेथॉन स्पर्धा जिल्हा क्रीडांगणापासून ते राणी कित्तूर चन्नम्मा चौक, कॉलेज रोड मार्गे मिलिटरी महादेव आणि पुन्हा जिल्हा क्रीडांगण या मार्गावर आयोजिली असून या १५-३०, ३१ – ४५, आणि ४५ वर्षाहून अधिक अशा तीन गटात स्पर्धा होणार आहे. यातील प्रथम क्रमांकाच्या विजेत्याला रुपये ८००० आणि मानचिन्ह, द्वितीय क्रमांकाच्या विजेत्याला रुपये ५००० आणि मानचिन्ह तसेच तृतीय क्रमांकाच्या विजेत्याला रुपये ३००० आणि मानचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे.

स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांसह मॅरेथॉन पूर्ण करणाऱ्या प्रत्येक स्पर्धकाला पदक देऊन गौरविण्यात येणार आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी येणाऱ्या स्पर्धकांसाठी अल्पोपहाराची सोय देखील करण्यात आली असून प्रथमोपचार, आरोग्यसेवा, मॅरेथॉन मार्गावर पाण्याची व्यवस्था आणि स्पर्धेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक स्पर्धकाला टी – शर्ट पुरविण्यात येणार आहे. या स्पर्धेच्या अधिक माहितीकरिता ७०१९७०५८५९, ८२८३८७५१५०, ७०१९०५३१२२ या क्रमांकावर संपर्क साधावा असे कळविण्यात आले आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.