Monday, December 30, 2024

/

रस्ता दुरुस्तीसाठी अनगोळमध्ये उद्या बेमुदत धरणे सत्याग्रह

 belgaum

बेळगाव लाईव्ह :अनगोळ येथील धर्मवीर संभाजी महाराज चौक ते अनगोळ लास्ट बस स्टॉप (गांधी स्मारक) पर्यंतच्या रस्त्याची दुरुस्ती आणि डांबरीकरणाकडे वारंवार मागणी करूनही दुर्लक्ष केले जात असल्याच्या निषेधार्थ उद्या शुक्रवार दि. 30 ऑगस्ट रोजी सकाळी ध. संभाजी महाराज चौक येथे आपण स्थानिक रहिवाशांसह बेमुदत धरणे सत्याग्रह करणार असल्याची माहिती वजा इशारा माजी नगरसेवक विनायक गुंजटकर यांनी एका निवेदनाद्वारे महापौरांना दिला आहे.

माजी नगरसेवक विनायक गुंजटकर यांनी उपरोक्त माहिती वजा इशाऱ्याचे निवेदन आज गुरुवारी सकाळी महापौरांच्या गैरहजेरीत उपमहापौर आनंद चव्हाण यांच्याकडे सादर केले.

गेल्या 2022 मध्ये श्री गणेश उत्सवानंतर अनगोळ येथील धर्मवीर संभाजी चौक ते रघुनाथ पेठपर्यंतच्या सुमारे 120 मीटर अंतराच्या रस्त्याशेजारी खुदाई करून भुयारी गटार बांधकाम हाती घेण्यात आले होते. तथापि सदर काम पूर्ण झाल्यानंतर खोदलेली चर व्यवस्थित बुजवून रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले नाही.

त्यामुळे सदर रस्ता अत्यंत खराब झाला आहे. परिणामी अनगोळ शेवटच्या बस स्टॉपपर्यंत म्हणजे गांधी स्मारकापर्यंत परिवहन बसेस जाऊ शकत नाहीत. उन्हाळ्यात धुळीने मागून आणि पावसाळ्यात चिखलामुळे या रस्त्याची वाताहत होत असते. त्यामुळे घरे व दुकाने सतत साफ करावी लागत असल्याने दुकानदार आणि स्थानिक रहिवासी त्रस्त झाले आहेत. रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये साचलेले पाणी आणि चिखलमय निसरड्या झालेल्या या रस्त्यावर दररोज एखाद दुसरा अपघात घडत असतो.City corporation

सदर रस्त्याची दुरुस्ती व डांबरीकरण संदर्भात गेल्या 23 फेब्रुवारी, 1 मार्च, 16 मे आणि 1 जुलै 2024 रोजी महापौरांसह संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन सादर करून देखील आजपर्यंत कोणतीच कार्यवाही झालेले नाही. याच्या निषेधार्थ आणि आमच्या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी

माझ्यासह स्थानिक रहिवाशांनी दि. 30 ऑगस्ट 2024 रोजी ध. संभाजी महाराज चौक अनगोळ येथे बेमुदत धरणे आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे, अशा आशयाचा तपशील माजी नगरसेवक विनायक गुंजटकर यांनी महापौरांच्या नावे सादर केलेल्या निवेदनात नमूद आहेत.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.