Tuesday, November 19, 2024

/

गावे स्थलांतरित सर्वपक्षीय बैठकीत काय झालं?

 belgaum

बेळगाव लाईव्ह :भीमगड संरक्षित वन्यजीव अभयारण्याच्या हद्दीत असणाऱ्या ग्रामस्थांनी त्यांच्या सर्व मागण्या शासनाने पूर्ण केल्यास स्थलांतरासाठी तयार असल्याचे मत आज व्यक्त केले.

खानापुरातील शिवस्मारकाच्या माजी आमदार व्ही. वाय. चव्हाण सभागृहात आज आमदार विठ्ठल हलगेकर यांच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय बैठक संपन्न झाली. भीमगड अभयारण्य क्षेत्रातील ग्रामस्थांसह तालुक्यातील सर्वपक्षीय नेते व संबंधित गावच्या नागरिकांबरोबर ही बैठक झाली. या बैठकीत भीमगड अभयारण्य क्षेत्रात येणारी गवाळी, तळेवाडी, कोंगळा, आमगाव, पास्टोली ही गावे स्थलांतरित होण्यास तयार झाली आहेत.

पण समाधानकारक पुनर्वसन, एकाच ठिकाणी गाव वसविणे, कुटुंबातील प्रत्येक सदस्याला प्रत्येकी 15 लाख भरपाई, रस्ते, वीज, बस, शिक्षण, आरोग्याच्या सुविधा पुरविणे. शेतीच्या मोबदल्यात शेती अथवा समाधानकारक भरपाई देणे. रोजगाराची सोय करणे. या मागण्यांची सरकारने पूर्तता करावी अशी मागणी लावून धरली. काही मतभेद असले तरी सरकारने योग्य मोबदला देऊन योग्य ठिकाणी पुनर्वसन केले तर आपण स्थलांतर होण्यास तयार आहोत अशी भूमिका त्यांनी घेतली.

गवाळीसारख्या सुविधां पासून वंचित असलेल्या ग्रामस्थांनी आम्हाला कोणत्याही परिस्थितीत स्थलांतरित व्हायचे आहे असे यावेळी सांगितले. आमच्या सर्व मागणीय मान्य केल्या तर स्थलांतर होण्याचा निर्णय घेतला जाईल.Khanapur meeting

पुढील कार्यवाही करण्यासाठी सर्वपक्षीयांचा समावेश असलेली स्थानिकांना घेऊन समिती स्थापन करून पाठपुरावा करण्याचा निर्णय घेण्यात आला. आजच्या बैठकीत महत्त्वाचे तीन ठराव करण्यात आले. वयाचा विचार न करता कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला पंधरा लाख रुपये भरपाई, संबंधित गावांना त्याच ग्रामपंचायतीच्या परिसरात घरे बांधून स्थलांतर करण्यात यावे. ज्यांना या प्रकल्पात शेती गमवावी लागणार आहे त्यांना तेवढीच शेती अथवा योग्य मोबदला देण्यात यावा ठराव हे संमत करण्यात आले.

या ठरावांची माहिती वनखात्याला पाठवली जाणार असल्याचे आमदार विठ्ठल हलगेकर यांनी सांगितले. आज झालेल्या सर्व पक्षीय बैठकीत काँग्रेस, भाजप, महाराष्ट्र एकीकरण समिती, आप, निजदसह विविध संघटना, आजी माजी आमदार, जिल्हा, तालुका आणि ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.