बेळगाव लाईव्ह : गेल्या ३ महिन्यात झालेल्या अपघातांच्या संख्येवर नियंत्रण मिळविण्यात आले असून मागील ३ महिन्यात झालेल्या अपघातांमध्ये वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्यामुळे झालेल्या अपघातांची विशेषतः दुचाकीच्या अपघातांची संख्या अधिक आहे, अशी माहिती एडीजीपी अलोककुमार यांनी दिली.
आज बेळगाव पोलीस आयुक्त कार्यालयात जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन, पोलीस आयुक्त याडा मार्टिन मारबानीयांग, रहदारी विभागाचे तसेच कायदा व सुव्यवस्था विभागाचे वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्या उपस्थितीत एडीजीपी आलोक कुमार यांनी बेळगाव जिल्ह्यातील पोलीस अधिकारी, बेळगाव शहर आणि वाहतूक विभागाशी संबंधित विविध विभागांच्या अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी उपरोक्त माहिती दिली.
गेल्या ३ महिन्यात झालेल्या एकूण अपघातांपैकी ७० ते ८० टक्के अपघात हे दुचाकीधारकांचे झाले आहेत. राज्य आणि राष्ट्रीय महामार्गावरून वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या, विना हेल्मेट वाहन चालविणे, वाहनावरून प्रवास करणे यासारख्या कारणामुळे अनेक दुचाकीस्वारांना आपला जीव गमवावा लागला आहे. अपघातांच्या आणि अपघातातील मृतांच्या वाढत्या संख्या लक्षात घेत रहदारी विभागाने हि संख्या नियंत्रणात आणण्यासाठी अनेक उपाययोजना राबविल्या आहेत. बाची, रायचूर, यरगट्टी, निपाणी, मुधोळ या महामार्गावर अनेक अपघात होत असल्याचे निदर्शनात आले असून याठिकाणी अपघातांवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न उपाययोजना आखण्यात येत आहेत, असे ते म्हणाले.
दुचाकीस्वारांनी वाहन चालविताना आणि वाहनावर बसून प्रवास करणाऱ्या नागरिकांनी प्रवास करताना आवश्यक ती सर्व खबरदारी घेणे गरजेचे आहे. महामार्गावरून ओव्हर स्पीड वाहन चालविणे, ड्रिंक अँड ड्राइव्ह प्रकरणे, महामार्गावरील लेन डिसिप्लिन न पाळणे, वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणे, कागदपत्रे अपूर्ण पद्धतीने हाताळणे, यासारखे प्रकार निदर्शनात आले आहेत. पावसाळ्याच्या दिवसात गाडी घसरण्याची दाट शक्यता असते. अशा कारणांमुळे अनेक अपघात घडले असून यमकनमर्डी, निपाणी, हिरेबागेवाडी आदी भागात अनेक अपघात झाले आहेत.
अपघात आणि अपघातातील मृतांची संख्या यावर नियंत्रण मिळविण्यासाठी रहदारी विभाग, पोलीस विभाग आणि जिल्हा प्रशासनाच्या समन्वयाने उपाययोजना आखण्यात येत असून सुरळीत वाहतूक, वाहतुकीशी निगडित समस्यांसंदर्भात विशेष काळजी घेतली जाणार आहे. येत्या २० सप्टेंबरपासून वाहतुकीच्या नियमांचे कठोर पालन करण्यासंदर्भात विशेष मोहीम हाती घेतली जाणार आहे. या माध्यमातून जनतेला सुरक्षित वाहतुकीसंदर्भात आवाहन करण्यात येणार असल्याचे एडीजीपी अलोक कुमार यांनी सांगितले.
यावेळी ऑटो रिक्षा मीटर संदर्भातही त्यांनी माहिती दिली. शहरात धावणाऱ्या सर्व ऑटो रिक्षांना मीटर अनिवार्य करण्यात आले असून सर्व रिक्षाचालकांनी मीटर बसवून घेणे गरजेचे आहे. सर्वसामान्य नागरिकांना योग्य भाडे आकारण्यासाठी मीटर सक्ती करण्यात आली असून हि कारवाई बऱ्याच दिवसांपासून प्रलंबित आहे. जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून सर्व ऑटो रिक्षकांना मीटरची व्यवस्था करून देण्यासंदर्भात निर्णय घेण्यात येणार असल्याचे एडीजीपी आलोक कुमार म्हणाले.
या बैठकीला पोलिस आयुक्त याडा मार्टिन मारबानीयांग, आयजीपी विकास कुमार, एसपी भीमा शंकर गुळेद, डीसीपी रोहन जगदीश, आयजीपी उत्तर विभाग, मार्केट, खडेबाजार, एपीएमसी पोलिस स्थानक आणि विविध पोलीस स्थानकातील वरिष्ठ अधिकारी, पीएसआय, निरीक्षक उपस्थित होते.