बेळगाव लाईव्ह : बेळगाव जिल्हा पंचायत कार्यालयाच्या सभागृहात जिल्हा व तालुका स्तरावरील विविध विभागांच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा पंचायत कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत अधिकारी वर्गाला राहुल शिंदे यांनी विविध सूचना केला.
यावेळी बोलताना ते म्हणाले, तालुक्यांच्या विकासात कार्यकारी अधिकाऱ्यांची भूमिका महत्त्वाची असून तालुकास्तरीय अधिकाऱ्यांनी समन्वयाने काम करून जनतेचे प्रश्न लवकर सोडवावेत. तालुकास्तरीय अधिकाऱ्यांनी आपल्या तालुक्यांना नियमित भेटी देऊन त्यांच्या विभागामार्फत होत असलेल्या विकासकामांची पाहणी करून कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी तसेच तालुक्याच्या विकासासाठीही पावले उचलावीत.
प्रत्येक तालुक्यासाठी यापूर्वीच नोडल अधिकारी नेमण्यात आले असून संबंधित नोडल अधिकाऱ्यांनी न चुकता दर महिन्याला तालुक्यांना भेट देऊन नियमित बैठका घेऊन अहवाल सादर करावा. मुख्यमंत्री जनप्रतिसाद कार्यक्रमात प्राप्त झालेल्या तक्रारींना संबंधित विभागीय अधिकाऱ्यांनी तत्परतेने प्रतिसाद द्यावा व त्यावर उपाययोजना कराव्यात. विविध विभागांच्या वसतिगृहातील विद्यार्थ्यांना देय असलेले विद्यार्थी वेतन तातडीने अदा करण्यात यावे. विद्यार्थ्यांची आधार सीडिंग प्रक्रिया त्वरित पूर्ण करा. पंधरवड्याच्या आत विद्यार्थ्यांची थकबाकी भरण्याची कार्यवाही करावी.
पिण्याच्या पाणीपुरवठ्यासाठी जिल्हास्तरीय टास्क फोर्स समिती यापूर्वीच स्थापन करण्यात आली असून, तालुकास्तरावरही समित्या स्थापन करून पाण्याची चाचणी करून उपाययोजनांचा सर्वंकष अहवाल द्यावा. शहरी आणि ग्रामीण भागात नियमितपणे पिण्याच्या पाण्याच्या चाचण्या झाल्या पाहिजेत. पाणी तपासणीनंतर पाणी पिण्यायोग्य नसेल तर अशा जलस्त्रोतांजवळ ठळक लाल अक्षरात सूचना फलक लावावा. या कामात आरोग्य विभाग, तालुका पंचायत व ग्रामपंचायतींनी समन्वयाने काम करावे, अशा सूचना त्यांनी केल्या.
या बैठकीला जिल्हा पंचायत उपसचिव बसवराज आडविमठ, बसवराज हेग्गनायक, मुख्य नियोजन अधिकारी गंगाधर दिवटर, कृषी विभागाचे सहसंचालक शिवनगौडा पाटील यांच्यासह तालुकास्तरीय अधिकारी उपस्थित होते.