बेळगाव लाईव्ह:महाराष्ट्र राज्य येळळूर फलक हटवल्यानंतर येळळूर ग्रामस्थांवर पोलिसांनी अमानुष लाठीहल्ला केला. त्यानंतर ग्रामस्थांवरच गुन्हे दाखल करण्यात आले याप्रकरणी शुक्रवारी झालेल्या सुनावणीत न्यायालयाने वारंवार गैरहजर असलेल्या तीन साक्षीदारांना वगळले तर मुख्य फिर्यादीवर जप्तीचा इशारा देण्यात आला.
येळळूर गावच्या वेशी मध्ये असलेला महाराष्ट्र राज्य फलक पोलिसांनी 2014 मध्ये बळजबरीने हटविला. या प्रकाराला शांततेच्या मार्गाने विरोध करणाऱ्या ग्रामस्थांवर अमानुष हल्ला करण्यात आला. घराघरात जाऊन लोकांना मारहाण करण्यात आली. यामध्ये शेकडो लोक जायबंदी झाले. पण पोलिसांनी ग्रामस्थांवरच गुन्हा नोंदविला आणि न्यायालयात दोषारोप दाखल केले.
या प्रकरणाची आज शुक्रवारी न्यायालयात सुनावणी होती. न्यायालयाने या सुनावणीला वारंवार गैरहजर असणाऱ्या तीन साक्षीदारांना या प्रकरणातून वगळण्याचा आदेश बजावला. तर मुख्य फिर्यादीदार तत्कालीन सीपीआय मरूळसिद्धाप्पा आर. डी. हे सुद्धा सुनावणीला वारंवार गैरहजर राहिले वॉरंट बजावूनही ते सुनावणीला येत नसल्यामुळे त्यांच्या विरोधात प्रॉक्लामेशन (मालमत्ता जप्ती इशारा) दाखल करण्याचा आदेश न्यायालयाने बजावला.
आज चार प्रकरणांची सुनावणी होणार होती. पण साक्षीदार आणि फिर्यादीदार गैरहजर राहिल्याने पुढील सुनावणी 18 जुलै रोजी घेण्याचा आदेश देण्यात आला.
येळळूर ग्रामस्थांच्या वतीने ॲड शामसुंदर पत्तार ॲड श्याम पाटील आणि ॲड हेमराज बेंचन्नवर काम पाहत आहेत.