बेळगाव लाईव्ह : मागीलवर्षी पावसाने दडी मारल्याने यंदा फेब्रुवारी – मार्च महिन्यापासूनच बेळगावकरांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागले होते.
एप्रिल महिन्यापासूनच डेड स्टॉक मधून उपसा करण्याची वेळ आली असतानाच वळिवाचा पाऊस आणि वेळेवर हजर झालेला मान्सून यामुळे धरण परिसरात झालेल्या पावसामुळे राकसकोप जलाशय पूर्णपणे भरले आहे.
पावसाच्या दमदार सलामीमुळे शहराच्या पाणी पुरवठ्याची अडचण दूर झाली आहे. पाणलोट क्षेत्रात दोन दिवस दमदार पाऊस झाल्याने राकसकोप जलाशयातील पाणीसाठ्यात वाढ झाली असून बेळगावच्या पाणी समस्येवर यंदा तोडगा निघाला आहे.
गेल्या आठवड्याभरात दमदार पावसाने हजेरी लावल्याने राकसकोप जलाशय तुडुंब भरले असून बेळगावकरांची पाणीसमस्या सुटली आहे. मागील वर्षी ऑगस्ट महिना उजाडला तरीही जलाशयात पाणी नसल्याने भेगाळलेली जमीन दिसून येत होती.
मात्र यंदा पावसाने जोरदार हजेरी लावल्याने जुलै महिन्यातच जलाशय पूर्ण भरला आहे. पुढील काही दिवसात पुन्हा मुसळधार पाऊस झाला तर धरण ओव्हरफ्लो होण्याची शक्यता आहे. १५ जून नंतर धरण क्षेत्रात दमदार पाऊस झाला असून धरणातील पाण्याचा साठा उत्तम आहे.
मागील वर्षी राकसकोप जलाशयाच्या तळ गाठल्यामुळे भेगाळलेल्या स्थितीतील तळ दिसून आला होता. दरवर्षी वातावरणात होणारे अनेक बदल लक्षात घेत बेळगाव महानगरपालिकेने जलाशयातील गाळ काढणे गरजेचे होते.
जलाशयाच्या तळ गाठल्याने मनपाला गाळ काढण्याची संधी मिळाली होती. मात्र याकडे प्रशासनाने केलेल्या दुर्लक्षामुळे हि बाब प्रलंबितच राहिली.