बेळगाव लाईव्ह :राकसकोप परिसरामध्ये गेल्या काही दिवसांपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे बेळगाव शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या राकसकोप जलाशयाची पातळी झपाट्याने वाढत असून जलाशय तुडुंब भरण्यासाठी केवळ 2.5 फूट पाण्याची गरज आहे.
राकसकोप जलाशयाची पाणी साठवणूक क्षमता कमाल 2475 फूट असून आज गुरुवारी दुपारी पाणी पातळी 2472.5 फूटावर पोहोचली आहे. त्यामुळे जलाशय तुडुंब भरण्यास आता अवघ्या अडीच फूट पाण्याची गरज आहे. त्यामुळे आज संपूर्ण दिवस आणि रात्री पावसाची मुसळधार सुरूच राहिल्यास उद्या शुक्रवारी राकसकोप जलाशय ओव्हर-फ्लो होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
पाणलोट क्षेत्रात पडणाऱ्या पावसानुसार प्रत्येक जलाशयातील पाणी पातळी कमी -जास्त होत असते. सध्या तरी राकसकोप जलाशयाच्या पाणलोट क्षेत्रात संततधार पाऊस होत आहे. पाऊस असाच सुरू राहिल्यास उद्या शुक्रवार दुपारपर्यंत जलाशय ओव्हर-फ्लो होऊ शकते.
मागील वर्षी 13 ऑगस्ट दुसऱ्या आठवड्यात हे जलाशय ओव्हर -फ्लो झाले होते. यापूर्वी गेल्या 10 वर्षात राकसकोप जलाशय जेंव्हा जेंव्हा ओव्हर फ्लो झाले ते वर्ष आणि तारीख अनुक्रमे पुढील प्रमाणे : 2010 -4 ऑगस्ट, 2011 -18 जुलै, 2012 मध्ये -6 ऑगस्ट, 2013 -22 जुलै, 2014 -30 जुलै, 2015 -4 ऑगस्ट, 2016 -7 ऑगस्ट, 2017 -10 सप्टेंबर, 2018 -16 जुलै, 2019 -30 जुलै, 2020 -6 ऑगष्ट, 2021 -22 जुलै, 2022 -17 जुलै, 2023 -(ऑगस्ट. दुसरा आठवडा)
जलाशयं तुडुंब भरल्यास त्याचे दरवाजे खुले केले जात असल्यामुळे आता उद्या यावर्षी पावसाळ्यात पहिल्यांदा राकसकोप जलाशयाचा एक दरवाजा खुला केला जाण्याची शक्यता आहे. दुसरीकडे कमाल पाणी साठवणूक क्षमता 51 टीएमसी असलेल्या हिडकल जलाशयातील पाण्याची पातळी आज 28 टीएमसी इतकी नोंदवली गेली आहे. हे प्रमाण मागील वर्षाच्या तुलनेत 29 टीएमसीने जास्त आहे.