बेळगाव लाईव्ह : राज्यातील वाल्मिकी महामंडळ घोटाळाप्रकरणाचे पडसाद राज्यभरात उमटू लागले असून आज बेळगावमधील कर्नाटक अनुसूचित जमाती वाल्मिकी राज्य युवा घटक संघटनेच्या वतीने या घोटाळ्याविरोधात आंदोलन छेडून निदर्शने करण्यात आली.
वाल्मिकी महामंडळात १८७ कोटी रुपयांचा घोटाळा झाला असून आपल्या समाजाचा पैसा अनेक खात्यांमध्ये बेकायदेशीर रित्या वर्ग करण्यात आला आहे. विविध राज्यातील बँक खात्यांमध्ये हि रक्कम जमा करण्यात आली आहे. हा घोटाळा मोठ्या प्रमाणात झाला आहे. मात्र याविरोधात समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती, नेतेमंडळी आणि लोकप्रतिनिधी मौन पाळून आहेत.
याविरोधात कुणीही आवाज उठविण्यासाठी तयार नसून या घोटाळ्यात सहभागी असलेल्या नेत्यांना आणि अधिकाऱ्यांना याचा जाब विचारून कडक तपास करण्यात यावा, तसेच दोषींवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी या संघटनेच्या वतीने करण्यात आली.
यावेळी आंदोलनात सहभागी झालेल्या आंदोलकांनी राणी कित्तूर चन्नम्मा चौकात जोरदार घोषणाबाजी करत संताप व्यक्त केला.
या आंदोलनात संघटनेचे महेश शिगीहळ्ळी, मल्लेश मुळगसी, रामा पुजारी, लगमन्ना होन्नंगी, भीमन्ना गन्नीकोप्प, मंजू तळवार आदींसह संघटनेचे पदाधिकारी, सदस्य आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते.