बेळगाव लाईव्ह:बेळगाव शहरातील उज्वलनगर येथील नाल्यात आज बुधवारी दुपारी साडे तीनच्या सुमारास एका अज्ञात युवकाचा मृतदेह आढळून आला असून हा एक चर्चेचा विषय झाला आहे.
उज्वलनगर येथील पावसाच्या पाण्याने प्रवाहित असलेल्या एका नाल्यात अज्ञात युवकाचा मृतदेह केरकचऱ्यासोबत झाडाच्या फांदीला अडकून पडलेल्या अवस्थेत आज दुपारी आढळून आला. याबाबतची माहिती मिळताच माळमारुती पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी हजर होऊन मृतदेह नाल्यातून बाहेर काढला.
तसेच पंचनामा करून तो मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सिव्हिल हॉस्पिटलकडे धाडला. दरम्यान घटनास्थळी बघ्यांची गर्दी झाली होती. पोलिसांकडून मयत युवकाची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे.
मयत युवकाचे वय 35 ते 40 वर्षे असावे असा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. नाल्यात आढळून आलेल्या युवकाच्या मृतदेहाबद्दल परिसरात तर्कवितर्क केले जात असून हा घातपाताचा तर प्रकार नाही ना? असा संशय व्यक्त केला जात आहे.
तथापि पोलीस तपासअंती संबंधित युवकाचा मृत्यू नेमका कशामुळे व कसा झाला? हे स्पष्ट होणार आहे. माळमारुती पोलीस ठाण्यात घटनेची नोंद झाली आहे.