बेळगाव लाईव्ह : हुंड्यासाठी आपला छळ केल्याचा आरोप करत विषप्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्या विवाहित तरुणीच्या विरोधात तसेच एका भाजप नेत्याच्या विरोधात सासरच्या मंडळींनी तक्रार दाखल केली आहे; यामुळे या प्रकरणात आणखी एक ट्विस्ट आला आहे.
बेनकनहळ्ळी ग्रामपंचायत व्याप्तीत येणाऱ्या गणेशपूर भागातील कन्विका गणेश गुड्याळकर (वय, २०) या विवाहितेने आत्महत्येचा प्रयत्न केला. यानंतर तिच्यावर बेळगाव जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु करण्यात आले. दरम्यान प्रसारमाध्यमांना माहिती देताना विवाहित तरुणी आणि तिच्या नातलगाने तरुणीवर हुंड्यासाठी अत्याचार करण्यात आल्याचे सांगितले.
लग्नात देण्यात आलेल्या हुंड्यासह लग्नानंतरही मागणीनुसार हुंडा देण्यात आल्याचे तरुणीने सांगितले. परंतु सासरच्या मंडळींनी आणखी हुंड्याची मागणी करत आपला छळ केल्याचे तरुणीने सांगितले.
तरुणीने केलेल्या या तक्रारीनंतर तिच्या सासऱ्यांनी आता तिच्याविरोधात काउंटर केस दाखल केली असून लग्नासाठी तरुणीसह भाजप नेते पृथ्वीसिंग यांनी आपल्या मुलाचा छळ केल्याचे तक्रारी म्हटले आहे. विवाहित तरुणी कन्विका आणि आपल्या मुलाचे शाळेपासून मैत्रीसंबंध होते.
त्यानंतर मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. मात्र कन्विकाने गणेश गुड्याळकर सह त्याच्या आई – वडिलांच्या जीवाला धोका निर्माण करून लग्न केल्याचा आरोपही करण्यात आला आहे. लग्नानंतर सदर तरुणीला गांजा, सिगारेट आणि दारूचे व्यसन जडले होते. वारंवार ती याचे सेवन करत होती, असा आरोप करत गणेशच्या पालकांनी गांजा, सिगारेट, दारूच्या बाटलीसह तिचे फोटो प्रसिद्ध केले आहेत. इतकेच नव्हे तर सदर तरुणीचे इतर तरुणांशी अनैतिक संबंध असल्याचाही आरोप करण्यात आला आहे.
विवाहित तरुणी आपल्या सासरच्या मंडळींना न सांगताच दोन ते तीन दिवस सहलीसाठी गेली होती. मात्र यादरम्यान पृथ्वीसिंह आणि त्याच्या साथीदारांनी कन्विका कुठे गेली? असा जाब विचारत धमकावल्याचा आरोप गणेशच्या कुटुंबीयांनी केला आहे. कन्विकाने आपल्या वाईट व्यसनांमुळे आत्महत्येचा प्रयत्न केल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
विवाहित तरुणीसह आता तिच्या सासरच्या मंडळींकडूनही परस्पर विरोधी तक्रार दाखल केली असून याप्रकरणी पोलीस तपासाअंती कोणत्या गोष्टी समोर येतील हे पाहणे गरजेचे आहे.