बेळगाव लाईव्ह : माणसाचा शेवटचा प्रवास तरी सुखकर व्हावा अशी प्रत्येकाची इच्छा असते, मृत्यूनंतर ज्या ठिकाणी अंत्यविधी केले जातात त्या ठिकाणी कोणतीही गैरसोय न होता त्या व्यक्तीची पाठवणी व्हावी, असे अनेकांचे म्हणणे असते. मात्र बेळगाव महानगरपालिकेच्या कृपाशीर्वादाने अनेकांचा शेवटचा प्रवास अंधारातून होऊ लागला आहे.
सध्या या प्रकाराची जोरदार चर्चा होत असून महानगरपालिकेच्या गलथान कारभाराचे धिंडवडे उडत आहेत. शहापूर येथील स्मशानभूमीत रात्रीच्या वेळी अंधाराचे साम्राज्य पसरलेले असते. त्यामुळे पेटणाऱ्या एका चितेच्या प्रकाशात दुसरी चिता पेटवण्याची वेळ येऊ लागली आहे. याबद्दल संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.
स्मार्ट सिटी च्या नावाखाली सगळीकडे अंधार असताना किमान स्मशानभूमीत तरी उजेड ठेवण्याचे काम महानगरपालिकेने करावे अशा भावना व्यक्त होत आहेत. बेळगावच्या सदाशिवनगर स्मशानभूमितही सध्या अशाच पद्धतीचे वातावरण पाहायला मिळत आहे.
वेगवेगळ्या नागरी संघटना पुढाकार घेतात, तेव्हा स्मशानभूमीचे सुशोभीकरण केले जाते. मात्र सुशोभित केलेल्या स्मशानभूमीचे पुढे काय होते, ते सध्या बेळगाव शहरात पाहायला मिळत आहे.
किमान केलेल्या कामाची पोचपावती देताना नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून योग्य व्यवस्था ठेवण्याची गरज असताना महानगरपालिका याकडे दुर्लक्ष करत आहे. संबंधित नगरसेवकांनी इतर वेळी राजकारण करावे, मात्र अशा सुविधा देताना तरी किमान आपला धर्म पाळावा आणि अधिकाऱ्यांना काम करायला लावावे अशा संतप्त भावना नागरिकांच्या आहेत.