बेळगाव लाईव्ह:सध्याच्या पावसामुळे गुजरात भवनजवळ शास्त्रीनगर चौथा क्रॉस रस्त्याशेजारी ड्रेनेजचे चेंबर तुंबून सांडपाणी आसपासच्या घरांच्या आवारातून साचून राहिल्यामुळे नागरिकात तीव्र संताप व्यक्त होत असून सदर समस्येचे तात्काळ निवारण करण्याची जोरदार मागणी केली जात आहे.
महापालिकेकडून वेळच्यावेळी साफसफाई होत नसल्यामुळे शास्त्रीनगर चौथा क्रॉस येथील ड्रेनेज मोठ्या प्रमाणात तुंबले आहे. परिणामी चेंबरमधून बाहेर पडणारे सांडपाणी आसपासच्या घरांच्या आवारामध्ये तुंबून राहिले आहे. त्यामुळे येथील नागरिकांना घरातून बाहेर ये जा करणे कठीण झाले आहे.
साचलेल्या सांडपाण्यामुळे दुर्गंधी पसरून अस्वच्छतेचे वातावरण निर्माण झाले आहे. डास, माशांचा प्रादुर्भाव वाढला आहे. शहर परिसरात डेंग्यूचे रुग्ण असल्याच्या पार्श्वभूमीवर ही परिस्थिती निर्माण झाली असल्यामुळे सदर रस्त्यावरील नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. गेल्या अनेक वर्षापासून फक्त पावसाळाच नव्हे तर इतर वेळी देखील सदर ड्रेनेज तुंबूण्याची समस्या सातत्याने निर्माण होत असते.
या संदर्भात वेळोवेळी तक्रार करून देखील महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून त्याची दखल घेतली जात नसल्याची येथील रहिवाशांची तक्रार आहे. तसेच सध्या घरांच्या आवारात आणि परिसरात सांडपाणी तुंबण्याची जी समस्या निर्माण झाली आहे तिचे तात्काळ निवारण केले जावे. यासाठी युद्धपातळीवर ड्रेनेजची स्वच्छता केली जावी, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
बेळगाव लाईव्हशी बोलताना चौथा क्रॉस शास्त्रीनगर येथील रहिवासी अनिता अग्रवाल म्हणाल्या की, ड्रेनेजचे चेंबर तुंबून घराच्या आवारात शिरणाऱ्या सांडपाण्याचा हा त्रास आम्ही गेल्या 12 वर्षापासून सहन करत आहोत. यासंदर्भात वेळोवेळी तक्रार करूनही कोणीच दखल घेत नाही. प्रसिद्धी माध्यमे येतात फोटो व्हिडिओ काढतात निघून जातात. मात्र प्रत्यक्षात आमची ही समस्या आजतागायत सुटलेली नाही. घराच्या संपूर्ण आवारात सांडपाणी साचून रहात असल्यामुळे ये-जा करण्यासाठी रस्ता नाही. सांडपाण्याच्या या समस्येला कंटाळून आमचे भाडेकरू देखील घर सोडून निघून गेले आहेत. मला मधुमेहाचा विकार आहे. मधुमेही व्यक्तीचे पाय सतत पाण्यात राहिल्यास गॅगरिन होऊ शकते.
उद्या मला काही बरे वाईट झाले तर त्याला कोण जबाबदार? ड्रेनेजचे सांडपाणी घराच्या आवारात आणि घरामध्ये शिरण्याची ही समस्या फक्त आमचीच नाही, तर या संपूर्ण गल्लीची आहे. फक्त पावसाळ्यात नव्हे तर अन्य वेळीही हा प्रकार घडत असतो. याबाबत महापालिकेकडे तक्रार केल्यास तुमचे घर सखल जागी असल्यामुळे ही समस्या निर्माण होत आहे असे सांगून हात झटकले जातात.
असे असेल तर रस्ता बांधताना सखल भागानुसार तो न बांधता उंचावर का बांधण्यात आला? रस्त्याची उंची वाढवली तर त्यावरील पाणी शेजारील घरामध्ये शिरणार ही साधी गोष्ट महापालिका अथवा पीडब्ल्यूडीच्या अभियंत्यांच्या लक्षात आली नाही का? असे असा संतप्त सवाल करून अनिता अग्रवाल यांनी ड्रेनेजच्या या सांडपाण्यामुळे पिण्याच्या पाण्याची समस्याही निर्माण झाल्याची तक्रार केली. तसेच लोकप्रतिनिधी व महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी त्याकडे गांभीर्याने लक्ष देऊन शास्त्रीनगर, चौथा क्रॉस येथील ड्रेनेजच्या समस्येचे तात्काळ निवारण करावे अशी मागणी केली.