बेळगाव लाईव्ह:पावसाचा जोर वाढत चालल्यामुळे बेळगाव जिल्हा प्रशासनाला सोमवारपासून सर्व शाळांना सुट्टी द्यावी लागली आहे. सुरुवातीला दोन दिवस त्यानंतर एक दिवस आणि पुन्हा दोन दिवस अशी सुट्टी देण्यात आली.
शाळा पूर्ववत कधी हे भविष्यातील पावसाच्या जोरावर अवलंबून असून शनिवारी सुट्टी दिली गेल्यास थेट शाळा सोमवारपासून सुरू होऊ शकते मात्र पुन्हा पावसाचा जोर वाढल्यास त्यानंतर सुट्टीत वाढ होऊ शकते, त्यामुळे शाळांसमोरील अभ्यासक्रम पूर्ण करण्याचाताण वाढणार आहे. अशा परिस्थितीत पुन्हा एकदा ऑनलाइन शिक्षणाकडे वळण्याची वेळ शाळांवर येणार की काय? असा प्रश्न निर्माण झालाय.
कोविडच्या काळात शाळा ऑनलाइन शिक्षणावरच आधारित होत्या. शाळांमध्ये प्रवेश घेऊन विद्यार्थ्यांना ऑनलाइन स्वरूपात शिक्षण घेण्याची वेळ आली होती. शाळांनीही या पद्धतीने व्यवस्था केली होती. कोविड गेल्यानंतर ही व्यवस्था बंद झाली आणि ऑफलाईन शिक्षण म्हणजेच शाळेमध्ये प्रत्यक्ष जाऊन शिक्षण घेणे सुरू झाले. मात्र यंदा पावसाने पुन्हा एकदा ही स्थिती निर्माण केली आहे.
केंद्रीय विद्यालयासारख्या काही शाळांनी आतापासूनच ऑनलाईन शिक्षण सुरू केले आहे. सोमवार आणि मंगळवारी दिलेल्या सुट्ट्यानंतर या शाळांनी आपल्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण देण्यास सुरुवात केली आहे.
आता पावसाचा एकंदर वाढता जोर पाहून इतर शाळांनाही हा मार्ग अवलंबावा लागणार असल्याची परिस्थिती निर्माण झाली असून या दृष्टीने विशेष व्यवस्था करण्याची गरज पालक व्यक्त करत आहेत.
पावसामुळे सुट्टी द्यावी लागली तरी अभ्यासक्रम निर्धारित वेळेत पूर्ण करावा लागतो, तो भरून काढण्यासाठी पाऊस थांबल्यानंतर शनिवार आणि रविवार असे ज्यादा अभ्यास वर्ग घ्यावे लागतात. हे टाळण्यासाठी दिलेल्या सुट्टीच्या काळात विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिकवले गेल्यास अभ्यासक्रम पूर्ण करण्याचा ताण शाळांवर पडणार नाही, या दृष्टीने आता शिक्षण खात्याने पुढाकार घेण्याची गरज असून संबंधित सूचना शाळांना द्याव्या लागणार अशी परिस्थिती सतत कोसळणाऱ्या पावसाने निर्माण केली आहे.