बेळगाव लाईव्ह :बेळगाव शहराच्या रिंग रोड संदर्भातील प्रस्तावावर विधान परिषदेमध्ये झालेल्या चर्चेमध्ये 69.387 कि.मी. लांबीच्या या रिंग रोडची तीन टप्प्यात निर्मिती होणार असून पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील रस्त्याचा कृती आराखडा तयार आहे तर तिसऱ्या टप्प्याचा आराखडा तयार केला जात आहे, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री सतीश जारकीहोळी यांनी दिली.
विधान परिषदेमध्ये परिषदेचे सदस्य एम. नागराजू यादव यांनी बेळगावच्या रिंगरोड संदर्भातील प्रश्न काल गुरुवारी उपस्थित केला होता. त्यावेळी त्याला उत्तर देताना मंत्री सतीश जारकीहोळी बोलत होते. त्यांनी सांगितले की, बेळगाव शहरातील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी रिंग रोड निर्मितीचा प्रस्ताव आहे.
एकूण तीन टप्प्यात हा रिंग रोड उभारण्यात येणार आहे. सदर रिंग रोडची लांबी 69.387 कि.मी. इतकी असणारा असून रोडची निर्मिती तीन टप्प्यात केली जाणार आहे. दोन टप्प्यांचा कृती आराखडा तयार आहे, तर तिसऱ्या टप्प्यातील कृती आढावा आराखडा तयार करण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यात 34 कि.मी. लांबीचा रस्ता निर्माण केला जाणारा आहे.
या संदर्भातील भूसंपादन प्रक्रिया मार्च 2023 मध्ये पूर्ण झाली आहे. तसेच दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील भूसंपादनाची प्रक्रिया हाती घेण्यासाठी 28 जून 2023 आणि 24 ऑगस्ट 2023 रोजी अधिसूचना जारी करण्यात आली आहे.
या अधिसूचनेद्वारे 390 हेक्टर जमीन संपादित करण्याचा प्रस्ताव असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री सतीश जारकीहोळी यांनी दिली.