बेळगाव लाईव्ह : कोणतेही काम मनावर घेतले तर ते केल्याशिवाय राहणार नाहीत अशी इमेज असलेले बेळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री सतीश जारकीहोळी हे सध्या पूर परिस्थितीवर नियंत्रण आणण्यात व्यस्त झाले आहेत पालक या नात्याने त्यांची ती जबाबदारी देखील आहे.
बेळगाव जिल्हा पालक मंत्री सतीश जारकीहोळी यांनी शुक्रवारी दिवसभर खानापूर तालुक्यातील पूरग्रस्त भागाचा दौरा करून खानापूर तालुक्यातील जनतेच्या समस्या ऐकून घेतल्या, खानापूरहून बेळगावात आल्यानंतर त्यांनी पूरग्रस्त मदत आढावा बैठक घेतली. बेळगाव जिल्हा पंचायतीच्या नवीन आलेल्या तयार झालेल्या सभागृहात जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांनी रात्री नऊ वाजेपर्यंत बैठक घेत सततच्या पावसामुळे व पुरामुळे जनतेला कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी परस्पर समन्वयाने अधिकाऱ्यांनी काम करावे सूचना दिल्या.
सतीश जारकीहोळी यांनी मुसळधार पावसामुळे उद्भवणाऱ्या पूरपरिस्थितीचा पुरेसा सामना करण्यासाठी तहसीलदारांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील आमदारांच्या सतत संपर्कात राहावे. याशिवाय तहसीलदारांनी संबंधित आमदारासोबत तातडीने बैठक घ्यावी अशीही सूचना केली.
महानगरपालिका आणि तालुका केंद्रांमध्ये हेल्पलाईन केंद्रे सुरू करावीत ती मदत केंद्रे दिवसाचे चोवीस तास कार्यरत असावीत. जनतेकडून आलेल्या तक्रारींना तत्काळ प्रतिसाद देण्याच्या सूचना त्यांनी केल्या.काळजी केंद्रांवर निवारा शोधणाऱ्या लोकांची गैरसोय होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. केअर सेंटरमध्ये दर्जेदार जेवण आणि स्नॅक्स पुरविण्यात यावे. या व्यतिरिक्त, संसर्गजन्य रोगांच्या प्रसारावर लक्ष ठेवले पाहिजे आणि आवश्यक पुरवठ्याची कमतरता सुनिश्चित केली पाहिजे.
अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या घरांचे सर्वेक्षण करण्यात यावे. सर्वेक्षणाच्या कामातील त्रुटी खपवून घेऊ नये. कोणत्याही कारणाने कोणावरही अन्याय न करता सर्वेक्षणाचे काम करण्यात यावे.
धोकादायक पुलांवरील वाहतूक निर्बंध:
जिल्ह्यातील धरणांमधून होणाऱ्या पाण्याच्या आवकवर सातत्याने लक्ष ठेवावे. पुलांवर धोकादायक पातळीवर पाणी वाहत असल्यास अशा पुलांवरून वाहतुकीस बंदी घालण्यात यावी अशाही सूचना त्यांनी केल्या
अतिवृष्टीसारखी ही गंभीर परिस्थिती पुरेशा प्रमाणात हाताळण्यासाठी जिल्ह्यातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सक्रिय राहावे. या कामात निष्काळजीपणा व उदासिनता दाखविल्यास अशा अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, अशा कडक सूचना आणि इशारा देखील जिल्हा पालकमंत्री सतीश जारकोहोळी यांनी दिला.
जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन म्हणाले की, जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळे हिडकल धरण 90 टक्के भरले असून, नवलतीर्थ 67.46 टक्के भरले आहे. जिल्ह्यातील पूरग्रस्त गावे आणि तालुक्यांमध्ये टास्क फोर्स तयार करण्यात येणार आहेत. 427 केअर सेंटर्सची तयारी करून त्यांना सुविधा पुरविल्या जातील आणि पूर आल्यास एकूण 35 बोटी वापरल्या जातील. ते म्हणाले की, 1 जूनपासून आजतागायत एकूण 5 मानवी जीव गेले असून, मार्गदर्शक सूचनांनुसार नुकसान भरपाई वाटपाची कार्यवाही सुरू आहे.
जिल्हा पंचायत सीईओ राहुल शिंदे, प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी मीना, बेळगाव जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकारी या बैठकीला उपस्थित होते.