एका तातडीच्या याचिकेद्वारे राणी चन्नम्मा विद्यापीठाच्या (आरसीयु) विद्यार्थ्यांनी माननीय न्यायपालिका, कुलपती, युजीसी आणि नॅक यांच्याशी संपर्क साधला असून विद्यापीठाचे प्रभावी कामकाज पुनर्संचयित करण्यासाठी त्वरित हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे. हे आवाहन गंभीर प्रशासकीय विलंबामुळे धोक्यात आलेल्या हजारो विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्यावर प्रकाश टाकणारे आहे.
हे पत्र एका विद्यार्थ्याची दुरवस्था अधोरेखित करते ज्याने 3 वर्षांच्या एलएलबीसाठी एमएचसीइटी प्रवेश परीक्षेत 99.28 टक्के गुण मिळवूनही एक मौल्यवान वर्ष गमवण्याच्या धोक्याला तोंड द्यावे लागत आहे. त्याची तात्पुरती पदवी आणि सेमिस्टरच्या गुणपत्रिका वेळेवर न दिल्याने त्याचा मुंबईतील सर्वोच्च कायदा महाविद्यालयातील प्रवेश धोक्यात आला आहे. ही समस्या एका विद्यार्थ्यापलीकडे असून राणी चन्नम्मा विद्यापीठाशी संलग्न असलेल्या महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेतलेल्या इतर अनेक विद्यार्थ्यांना या समस्येने प्रभावित केले आहे. आरसीयू-बोर्ड राणी चन्नम्मा विद्यापीठासंदर्भात
पत्र लिहिणाऱ्या संबंधित पालकाने विद्यापीठाच्या अकार्यक्षमतेमुळे लांबलचक सेमिस्टर आणि निकाल उशीरा याचा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आणि भावी कारकीर्दीच्या संभाव्यतेवर कसा गंभीर परिणाम झालाय याची तपशीलवार माहिती दिली आहे. नोव्हेंबर 2023 मध्ये दाखल केलेल्या आरटीआयमध्ये विद्यापीठाने शैक्षणिक वेळापत्रकाचे (कॅलेंडर) पालन न केल्याचे उघड झाले आहे. ज्यामध्ये सेमिस्टर 7 ते 8 महिन्यांपेक्षा जास्त आहेत आणि निकाल जाहीर होण्यास 6 महिन्यांपेक्षा जास्त कालावधी लागला आहे.
आरसीयु निकाल : सहावे सेमिस्टर जुलै-ऑगस्ट 2024 पर्यंत संपवण्याचा हेतू होता जो जून 2024 मध्येच सुरू झाला, त्याच्या पूर्ण होण्याच्या तारखेबद्दल कोणतीही स्पष्टता देण्यात आली नाही. अशा विलंबांमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाते. विशेष करून भविष्यातील संधींसाठी वेळेवर मिळणाऱ्या शिक्षणावर अवलंबून असलेल्या मध्यम आणि कमी उत्पन्नाच्या पार्श्वभूमीतील विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होते. परीक्षा आयोजित केल्यानंतर निकाल जाहीर होण्यासाठी 6 ते 8 महिन्यांचा कालावधी लागतो. आता 2023-24 च्या बॅचचे पहिले सेमिस्टर नुकतेच पूर्ण झाले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना 6 ते 8 महिन्यांनंतर निकालाची अपेक्षा करावी लागणार आहे. तथापी यामुळे यूजी प्रोग्रामच्या अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांना एक शैक्षणिक वर्ष गमवावे लागणार आहे. सहावे सेमिस्टर नुकतेच सुरू झाले झाले असून ते सप्टेंबर किंवा ऑक्टोबरमध्ये कधीतरी संपण्याची शक्यता आहे. परिणामी पुढील वर्षी मार्चच्या आसपास निकाल लागतील. विद्यापीठाने दीक्षांत समारंभास उशीर करण्याबरोबरच अभ्यासक्रम पूर्णत्वाचे प्रमाणपत्र मिळण्यास विलंब केल्यामुळे विद्यार्थ्यांच्या नोकरीच्या संधींना बाधा येऊ शकते.
या विद्यापीठाचे निकाल अनेकदा चुकीचे असतात. पुनर्मूल्यांकन प्रक्रियेमुळे विद्यार्थ्यांवर अतिरिक्त भार पडतो. विद्यापीठाकडून वेळापत्रकातील समस्या सोडविण्याचे आश्वासन देण्यात येत असले तरी कोणतीही ठोस कृती दिसून येत नाही. उदाहरण द्यायचे झाल्यास 2023 च्या बॅचने मे 2024 मध्ये त्यांचे पहिले सेमिस्टर पूर्ण केले असले तरी निकाल अद्याप प्रलंबित आहे. कोविड-19 महामारी आणि इतर प्रशासकीय अडथळ्यांची सबब विद्यापीठाकडून दिली जात असली तरी वेळेवर शैक्षणिक क्रियाकलाप व्यवस्थापित करणाऱ्या इतर संस्थांच्या तुलनेत ती अपुरी पडतात.
या प्रणालीगत समस्यांचे निराकरण करण्यासाठी आणि राणी चन्नम्मा विद्यापीठ आपल्या विद्यार्थ्यांच्या हितासाठी कार्य करेल याची खात्री करण्यासाठी अधिकाऱ्यांकडून त्वरित कारवाई केली जावी अशी मागणी या पत्रात करण्यात आली आहे. ही याचिका विद्यार्थी कल्याण आणि सार्वजनिक हिताला प्राधान्य देणाऱ्या जबाबदार आणि कार्यक्षम शैक्षणिक संस्थांची गंभीर गरज अधोरेखित करणारी आहे.
दरम्यान, राणी चन्नम्मा विद्यापीठासंदर्भात पुढील प्रमाणे सार्वजनिक सूचना जारी करण्यात आली आहे. राणी चन्नम्मा विद्यापीठ बेळगावमध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची चेतावणी : आम्ही संबंधित सर्व विद्यार्थ्यांनी बेळगावच्या राणी चन्नम्मा विद्यापीठात प्रवेश घेण्यापूर्वी त्यांच्या पर्यायांचा काळजीपूर्वक विचार करावा असे आवाहन करतो. तुमच्या शैक्षणिक आणि व्यावसायिक भविष्यावर नकारात्मक परिणाम करू शकतील अशा महत्त्वपूर्ण समस्यांवर प्रकाश टाकणारे असंख्य अहवाल आणि तक्रारी आम्हाला मिळाल्या आहेत.
आपण पुनर्विचार का करावा : 1) शैक्षणिक विलंब – युजी विद्यार्थ्यांना त्यांच्या पदवी पूर्ण करण्यात बराच विलंब झाला आहे. साधारणत: तीन वर्षांचा कोर्स 4 वर्षांपर्यंत वाढतो. 2) कारकिर्दीवर (करिअर) परिणाम : प्रशासकीय अकार्यक्षमतेमुळे विद्यार्थ्यांच्या भावी कारकिर्दीच्या संभाव्यतेवर विपरित परिणाम झाला आहे. त्यांच्या नोकरीच्या क्षेत्रात प्रवेश करण्यास विलंब झाल्यामुळे त्यांच्या व्यावसायिक वाढीवर परिणाम झाला आहे.
कृती करण्याची वेळ :
आम्ही राणी चन्नम्मा विद्यापीठ, बेळगाव येथे प्रवेश घेण्याविरुद्ध जोरदार सल्ला देतो. कारण ते तुमचे शैक्षणिक आणि व्यावसायिक भविष्य जोखमीसाठी खूप महत्त्वाचे आहे. कृपया तुमच्या भावी कारकिर्दीच्या फायद्यासाठी स्वतःच्या निर्णयावर पुनर्विचार करा. माहिती मिळवा, हुशारीने योग्य शैक्षणिक संस्था निवडून आपले उज्वल भविष्य सुरक्षित करा.