बेळगाव लाईव्ह : मागील रविवारपासून पावसाचा जोर वाढला असून बेळगाव जिल्ह्याला पावसाने झोडपून काढले आहे. मुसळधार पावसामुळे नागरिकांची दैना उडाली असून नदी – नाल्याच्या परिसरात असणारी शेकडो एकर शेती पाण्याखाली गेली आहे.
नदी – नाले दुथडी भरून वाहू लागल्याने अनेक नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. जिल्ह्यात विविध ठिकाणी पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली असून घरे, घरांच्या भिंती, झाडे, वीजखांबांची पडझड देखील सुरु आहे.
या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन आपत्ती निवारण विभाग तत्परतेने कार्यरत असून संभाव्य पूर्वपरिस्थितीसाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना राबविण्यात येत आहेत. २२ जुलै ते २६ जुलै या कालावधीत बेळगाव जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये झालेल्या पावसाची नोंद खालीलप्रमाणे आहे.
अथणी ७३.४ मिमी, बेळगाव १७३.४ मिमी, बैलहोंगल ६०५.४ मिमी, चिकोडी २७४.१ मिमी, गोकाक ११८.६ मिमी, हुक्केरी १७४.६ मिमी, कागवाड १६६.५ मिमी, खानापूर १००७.५ मिमी, कित्तूर ४७०.४ मिमी, मूडलगी ७१.८ मिमी, निपाणी ३७४.२ मिमी, रायबाग ८७.९ मिमी, रामदुर्ग ६४.२ मिमी, सौंदत्ती १२५.६ मिमी अशी पावसाची नोंद झाली आहे.
गेल्या पाच दिवसात खानापूर तालुक्यात सर्वाधिक पावसाची नोंद झाली असून त्यापाठीपाठ बेळगाव तालुक्यात सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. शुक्रवारी सकाळपासून पावसाचा ओघ काहीसा ओसरला असून शुक्रवारी सायंकाळी जोरदार पावसाने हजेरी लावली.
तालुक्यातील काही भागात जोरदार वाऱ्यासह मुसळधार पाऊस बरसला असून जिल्हा प्रशासनाने सर्व नागरिकांना सतर्कतेचा इशाराही दिला आहे. २२ जुलै पासून बेळगाव जिल्ह्यातील विविध तालुक्यातील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली असून पावसाचा ओघ ओसरल्याने सोमवारपासून पुन्हा शाळा पूर्ववत सुरु होण्याची शक्यता आहे.
नद्या – नाल्यांना पूर आल्याने पाणी रस्त्यावरून, नागरी वस्तीत शिरले असून अशा परिसरातील नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहनदेखील जिल्हा प्रशासनाने केले आहे.