बेळगाव लाईव्ह :यावर्षी पावसाने एक प्रथा मोडली आहे. पाऊस जोरदार झाला की बेळगावचे जिल्हाधिकारी शाळांना सुट्टी जाहीर करतात आणि जाहीर केलेल्या सुट्टी दिवशीच ऊन पडते हा दरवर्षीचा पावसाचा अनुभव. मात्र यावर्षी जाहीर केलेली सुट्टी कामी आली आणि मुले सुरक्षित राहिली आहेत. उन्हाचा अजिबात पत्ता नाही तर पाऊस नेहमी सारखाच कोसळू लागला आहे. यामुळे जिल्हाधिकाऱ्यांना आता सुट्टीत आणखी वाढ करावी लागणार की काय? अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी सोमवार आणि मंगळवार असे दोन दिवस बेळगाव जिल्ह्यातील शाळांना सुट्टी जाहीर केली. त्यानंतर अनेक पालकांनी सोशल मीडियावर तसेच व्हाट्सअप ग्रुप वर आता ऊन पडणार…. अशा प्रकारचे मेसेज पसरवायला सुरुवात केली होती. कारण हा दरवर्षीचाच अनुभव होता.
मात्र पाऊस थांबलाच नाही. सोमवार आणि मंगळवारी दिलेली सुट्टी योग्य ठरली. मुले घराघरात सुरक्षित राहिली. आता पाऊस सुरूच राहिल्याने त्यांना पुन्हा शाळेत पाठवणे योग्य आहे की सुट्टी द्यावी लागणार याचा निर्णय जिल्हाधिकारी योग्य तो आढावा घेऊन घेणार आहेत. याची माहिती मिळाली आहे.
सध्याची परिस्थिती पाहता वाढीव पाऊस आणि पसरलेल्या गारव्यामुळे मुलांमध्ये आजाराचे प्रमाण वाढले आहे. आसपासच्या दवाखान्यांमध्ये आजारी रुग्णांमध्ये लहान मुलांची संख्या वाढत असून त्यांच्यामध्ये व्हायरल इन्फेक्शन चे प्रमाण अधिक असल्याचे दिसून येत आहे.
यामुळे पालक वर्गामध्ये काळजीची लाट निर्माण झाली आहे. पुन्हा शाळेला पाठवून या आजारात वाढ होण्यापेक्षा पाऊस आणखी दोन दिवस थांबेल का याची वाट बघून त्यानंतर मुलांना शाळेला पाठवता येईल. अशा प्रकारच्या प्रतिक्रिया पालक वर्गातून व्यक्त होत आहेत.
अनेकांनी बेळगाव लाईव्ह शी संपर्क साधून आणखी एक किंवा दोन दिवस सुट्टी जाहीर केली जाणार का ?असा प्रश्न उपस्थित केला असून त्यासंदर्भातील फीडबॅक ही बेळगाव लाईव्ह ने जिल्हाधिकाऱ्यांना दिला आहे. याच बरोबरीने हवामान खात्याचा अंदाज आणि इतर परिस्थितीचाआढावा घेऊन जिल्हाधिकारी लवकरच निर्णय घेतील आणि याबद्दलची घोषणा करतील अशी आशा निर्माण झाली आहे.