बेळगाव लाईव्ह :मुंबई येथे एकतर्फी प्रेमातून हिंदू युवतीवर अत्याचार करून तिचा निर्घृण खून करणाऱ्या नराधमाला कोणतीही दया न दाखवता फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी श्रीराम सेना हिंदुस्तानतर्फे एका निवेदनाद्वारे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे करण्यात आली आहे.
श्रीराम सेना हिंदुस्तानचे अध्यक्ष व महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते रमाकांत कोंडुसकर यांच्या नेतृत्वाखाली उपरोक्त मागणीचे निवेदन महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले. जिल्हाधिकाऱ्यांच्या सहाय्यकांनी निवेदनाचा स्वीकार करून तात्काळ पुढील कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. निवेदन सादर करण्यापूर्वी श्रीराम सेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी फाशी द्या फाशी द्या नराधमाला फाशी द्या, जय श्रीराम जय जय श्रीराम, बोलो भारत माता की जय अशा घोषणा देऊन साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले होते.
याप्रसंगी बेळगाव लाईव्हशी बोलताना श्रीराम सेना हिंदुस्तान से अध्यक्ष रमाकांत कोंडुसकर म्हणाले की, एका मुस्लिम युवकाने एकतर्फी प्रेमातून हिंदू युवतीवर अत्याचार करून तिचा निर्घृण खून केल्याची घटना नुकतीच मुंबई येथे घडली. कांही चूक नसताना, कोणताही संबंध नसताना फक्त प्रेमाला नकार दिला म्हणून त्या युवतीची हत्या झाली. आम्ही हिंदू धर्मात प्रत्येक स्थिर स्त्रीला मातेसमान मानतो, मग ती कोणत्याही जाती-धर्माची असो. तथापि गेल्या चार महिन्यांमध्ये देशात युवतींवर अत्याचार करून खून करण्याच्या ज्ञात असलेल्या तीन घटनांपैकी दोन घटना हुबळी येथे घडले आहेत.
त्यानंतर आज मुंबई येथे तशी घटना घडली. या पद्धतीच्या निंद्य घटना रोखण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने छ. शिवाजी महाराज यांनी स्त्रियांवर अन्याय अत्याचार करणाऱ्यांच्या बाबतीत लागू केलेला शिक्षेचा उपाय अंमलात आणावा.
जे नराधम कोणत्याही जाती धर्माच्या मुलींवर असे एकतर्फी अत्याचार करत असतील तर त्यांना वेळीच त्या ठिकाणी ठेचलं पाहिजे. कर्नाटकात पहिल्यांदा जी घटना घडली त्याच वेळी संबंधित नराधमाचा एन्काऊंटर करण्यात आला असता, त्याला यमसदनी धाडले असते तर त्यानंतर घडलेली घटना आणि आता मुंबई येथे घडलेली घटना घडली नसती. मुंबई येथे हत्या करण्यात आलेल्या युवतीचे आडनाव शिंदे आहे.
त्यामुळे माझी महाराष्ट्रातील शिंदे सरकारला ही विनंती आहे की त्यांनी संबंधित नराधमावर कठोर कारवाई करावी भर चौकात त्याला फाशी द्यावी. अशा गुन्हेगारांना भर चौकात फाशी दिली तरच एकतर्फी प्रेमातून मुलींची हत्या करण्याच्या अनिष्ट प्रवृत्तीला आळा बसेल, असे मत कोंडुसकर यांनी व्यक्त केले.