बेळगाव लाईव्ह : नानावाडी भागात अनेक मोठमोठ्या इमारती, अपार्टमेंट्स, मोठमोठी घरे बांधण्यात आली आहेत. वरून अत्यंत उच्चभ्रू वाटणाऱ्या या भागात अद्याप मूलभूत सुविधाही पोहोचलेल्या नाहीत. या परिसरात मोठमोठ्या अपार्टमेंट्स उभारण्यात आल्या आहेत. या भागातील आश्रय कॉलनी सध्या समस्यांच्या विळख्यात अडकली असून या भागात असणाऱ्या अपार्टमेंट्समध्ये ड्रेनेजची व्यवस्थाच नसल्याने इथला परिसर ड्रेनेजच्या सांडपाण्यामुळे तुंबला आहे.
नानावाडी परिसरात लक्ष्मी टेकडी, गणेशपूर आदी उंच भागातून पाणी वाहून येते. हे पाणी नानावाडी परिसरातून गेलेल्या नाल्यात येऊन मिळते. परंतु या नाल्याच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी योग्य पद्धतीने नियोजन न केल्याने पुढे वाहून जाणारे पाणी नानावाडी प्रवेश द्वारातच साचते. आश्रय कॉलनीतील अपार्टमेंट्सचे ड्रेनेजचे पाणीदेखील एकाच ठिकाणी तुंबते.
यामुळे येथील रहिवाशांना मोठ्या समस्येचा सामना करावा लागत असून उन्हाळ्याच्या दिवसात ड्रेनेजच्या पाण्यामुळे हा परिसर दुर्गंधीयुक्त बनतो. काही महिन्यांपूर्वी येथील बिल्डर्स आणि नागरिकांनी स्वखर्चाने सांडपाण्याचा निचरा होण्यासाठी ड्रेनेज लाईनची सोय केली होती. मात्र नाल्याच्या अशास्त्रीय नियोजनामुळे पुन्हा ही परिस्थिती जैसे थे टप्प्यावर येऊन पोहोचली.
याठिकाणी मोठमोठे बंगले, अपार्टमेंट उभारण्यापूर्वी प्रत्येक विभागातून परवानगी घेणे आवश्यक आहे. जर याठिकाणी ड्रेनेजची सुविधाच नसेल किंवा नियोजित इमारतींसाठी ड्रेनेजची व्यवस्थाच नसेल तर या इमारतींसाठी परवानगी कुणी का आणि कशी दिली? असा प्रश्न आता उपस्थित करण्यात येत आहे. आश्रय कॉलनीत सध्या ड्रेनेजच्या पाण्याबरोबरच पावसाचे पाणीही तुंबले आहे. ड्रेनेजच्या पाण्याचा निचरा होण्यासहीत येथील पाण्याचा निचरा होण्याचीही व्यवस्था करण्यात आलेली नाही.
रस्त्याच्या एकाच बाजूने गटारींची व्यवस्था करण्यात आली आहे. या भागात एक मोठी वसाहत उभारण्यात आली आहे. परंतु या वसाहतीतील सांडपाणी आश्रय कॉलनी परिसरात सोडले जाते. पावसाचे, गटारीचे आणि ड्रेनेजचे सांडपाणी रस्त्यावर साचल्याने येथील नागरिकांना या भागात वास्तव्य करणे कठीण बनले आहे. या अनेक सुविधांसह पथदीपांची समस्याही या भागात अनेक वर्षांपासून जैसे थे होती. मात्र गेल्या २ वर्षांपूर्वी या भागात पथदीप आले. मात्र पावसाळ्यात उद्भवणाऱ्या पाण्याच्या या समस्येमुळे अनेकवेळा नागरिकांना अंधारातच राहण्याची वेळ येते.
या भागातून पुढे जाणारा नाला हा कॅंटोन्मेंट हद्दीत येतो. तर नाल्याचा अर्धा भाग हा महानगर पालिकेच्या व्याप्तीत येतो. यामुळे नाला सफाईचा विषय पुढे आला कि एकमेकांकडे बोट दाखवून गेल्या १२ वर्षात नाल्याची सफाई करण्यात आली नाही, असा आरोप येथील नागरिकांनी केला आहे. आश्रय कॉलनी परिसरात साचलेल्या या सांडपाण्यामुळे रोगराई पसरण्याची भीती येथील नागरिकांनी व्यक्त केली आहे.
या भागातील नागरिक पालिकेला कर भरतात. परंतु पालिकेकडून कोणत्याच सुविधा या भागातील नागरिकांना उपलब्ध करून देण्यात आल्या नाहीत यामुळे येथील नागरिक पालिकेच्या या कारभारावर संताप व्यक्त करत आहेत. या भागातील समस्यांकडे पालिकेने तातडीने लक्ष पुरवून समस्या सोडवाव्यात अशी मागणी नागरीकातून होत आहे.