बेळगाव लाईव्ह : नानावाडी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकानजीक असणाऱ्या मुख्य रस्त्याशेजारील नाल्यात कचरा अडकून पडल्याने पाण्याचा निचरा होणे मुश्किल झाले असून याठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी तुंबले आहे. या भागातील बेजबाबदार नागरिकांनी या नाल्यात कचरा टाकल्याने मोठ्या प्रमाणात पाणी तुंबले असून याकडे प्रशासनाचीही डोळेझाक झाली आहे.
वारंवार आवाहन करण्यात येऊनही कित्येक नागरिक प्लास्टिक पिशवीतून कचरा भिरकावून देतात. परिणामी पावसाळ्यात अशा समस्यांना तोंड द्यावे लागते. नानावाडी येथे उद्भवलेली हि समस्या सोडविण्यासाठी येथील जागरूक कार्यकर्ते अशोक यल्लाप्पा कोरवी हे वयाच्या ६०व्या वर्षीही आपल्या जीवाची पर्वा न करता नाल्यात उतरून स्वच्छतेसाठी पुढाकार घेत आहेत.
तासाभराहून अधिक काळ अथक परिश्रम घेऊन नारायण भोसले, मोहिंदर नंदेश्वर, सत्यवान निर्गुण, सतीश रेडेकर, सचिन नंदेश्वर, सुनिल पाटील आणि सागर मगदूम आदींच्या सहकार्याने या नाल्यातील पाण्याचा निचरा करण्यास त्यांनी हातभार लावला आहे.
कचरा उचल करण्यासाठी दारात गाडी येऊनही नागरिकांचा आडमुठेपणा आणि बेजबाबदारपणा नडत असून अशा समस्यांकडे प्रशासनानेही कडक पाऊले उचलणे गरजेचे आहे.
तसेच तुंबलेले नाले, गटारी स्वच्छ करण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची गरज आहे. या भागातील नागरिकांनी देखील आपला परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी पुढाकार घेऊन कचरा गाडीतच कचरा टाकावा असे आवाहन जागरूक नागरिकांकडून करण्यात येत आहे.