बेळगाव लाईव्ह :ग्रामपंचायत मुतगा, देवस्थान कमिटी मुतगा, गाव सुधारणा मंडळ मुतगा आणि समस्त मुदगा ग्रामस्थांतर्फे येत्या शुक्रवार दि. 26 आणि शनिवार दि 27 जुलै रोजी ग्रामदेवता श्री भावकेश्वरी देवीची यात्रा भव्य प्रमाणात साजरी केली जाणार आहे. यासाठी ग्रामपंचायत, देवस्थान कमिटी आणि पोलीस प्रशासनातर्फे भाविकांसाठी यात्रेप्रसंगी रस्त्यावर अडचण निर्माण न करता रस्ते वाहतुकीस खुले ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
मुतगा (ता. जि. बेळगाव) येथील श्री भावकेश्वरी देवी यात्रेनिमित्त स्थानिक पंचक्रोशीतील तसेच परगावचे हजारो भाविक येत असतात. यासाठी ग्रामपंचायत आणि देवस्थान कमिटीच्यावतीने भाविकांसाठी जाहीर आवाहन करण्यात आले आहे. श्री भावेश्वरी यात्रेला उपस्थित राहणारे सर्व गावकरी आणि पै पाहुण्यांना विनंती करण्यात आली आहे की सदर यात्रा सर्वांनी शांततेने एकोपा आणि सद्भावना, सलोख्याने साजरी करायची आहे.
सर्वांनी वाहनांचे पार्किंग वगैरे संदर्भात कोणताही गोंधळ घालू नये. रहदारीस अडथळा निर्माण होऊ नये. रस्ता सर्व भाविकांसाठी ये-जा करण्यास सोयीचा व्हावा यासाठी शक्यतो सर्व पाहुणे मंडळींनी आपली वाहने घरासमोर रस्त्यावर लावण्याऐवजी शाळेचे मैदान अथवा गावातील नजीकच्या खुल्या जागेत पार्क कराव्यात. एकंदर आवश्यक सर्व खबरदारी घेऊन सर्वांनी संघटितपणे एकोप्याने ही यात्रा कोणतेही गालबोट न लागता सुरळीत पार पाडूया, असे आवाहन आज गुरुवारी सकाळी श्री भावकेश्वरी यात्रेनिमित्त करण्यात आले.
याप्रसंगी माजी ग्रा. पं. अध्यक्ष किरण पाटील, भालचंद्र पाटील ग्रा.पं. सदस्य पिंटू मल्लवगोळ, पोलीस उपनिरीक्षक मंजुनाथ, माजी ता. पं. सदस्य शामराव पाटील, देवस्थान कमिटीचे सदस्य हेमंत पाटील, माजी ग्रा. पं. सदस्य नारायण कणबरकर, राजू कणबरकर, परिश्रम पाटील, बाळू बिरादार, भैरू पाटील, सचिन पाटील, माजी ग्रा. पं. उपाध्यक्ष शिवाजी कणबरकर आदींसह पोलीस आणि गावकरी उपस्थित होते.
दरम्यान अलीकडे झालेल्या सांबरा येथील श्री महालक्ष्मी यात्रेप्रसंगी वाहतूक कोंडीची जी समस्या निर्माण झाली होती ती मुतगा येथील श्री भावकेश्वरी यात्रेदरम्यान होऊ नये यासाठी रहदारी पोलिसांनी देखील वाहतूक व्यवस्थेबाबत खबरदारीचे आवाहन केले आहे. मुतगा येथे यात्रेला जाणाऱ्या भाविकांनी सांबरा विमानतळाच्या दिशेने जाणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी या मार्गावर अडचण निर्माण करू नये. थोडक्यात वाहतुकीस अडथळा निर्माण होऊन बागलकोट महामार्गावर ये-जा करणाऱ्यांची गैरसोय होऊ नये यासाठी वाहनांचे पार्किंग व्यवस्थित केले जावे. रस्त्यावर वाहने न थांबवता रस्ता खुला राहील या पद्धतीने रस्त्याकडेला किंवा गावातील अथवा गावाजवळील खुल्या जागेत ती पार्क करावीत.
पार्किंग अथवा अन्य कारणावरून वितंड वाद न घालता, भांडण न करता सर्वांनी ही यात्रा एकोप्याने शांततेत साजरी करावी, असे जाहीर आवाहन पोलीस प्रशासनाने गावकरी आणि यात्रेसाठी येणाऱ्या परगावच्या भाविकांना केले आहे.