बेळगाव लाईव्ह : बेळगावचे माजी जिल्हाधिकारी आणि मुख्यमंत्र्यांचे विद्यमान आप्त सचिव एन. जयराम यांनी मोदगा गावातील श्री मारुती मंदिर देवस्थानाची मालमत्ता बळकावल्याचा आरोप श्रीराम सेना अध्यक्ष प्रमोद मुतालिक यांनी केला आहे. आज बेळगावमध्ये बोलाविण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
याबाबत अधिक माहिती अशी कि, मोदगा या गावातील मारुती देवस्थानाच्या मालकीची मालमत्ता आहे. या मालमत्तेची किंमत सुमारे २०० कोटी रुपये असून तब्बल ९३ एकर इतकी जमीन आहे. या मालमत्तेवर अतिक्रमण करून मालमत्ता बळकावण्यात बेळगावचे माजी जिल्हाधिकारी एन. जयराम यांचा वाटा आहे.
हि मालमत्ता एम. के. हुबळी येथील साखर कारखान्याचे अध्यक्ष नासिर बागवान यांना बेकायदेशीररीत्या देण्यात आली असल्याचा आरोप प्रमोद मुतालिक यांनी केला आहे. सदर देवस्थानाची जमीन बळकावणाऱ्या आणि मालमत्ता हडप करणाऱ्या माजी जिल्हाधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात यावी, यासंदर्भात माजी जिल्हाधिकाऱ्यांसह यामध्ये सहभागी असलेल्या इतर अधिकाऱ्यांचीही कसून चौकशी करण्यात यावी, अन्यथा याविरोधात तीव्र आंदोलन छेडू असा इशाराही प्रमोद मुतालिक यांनी दिला आहे.
प्रमोद मुतालिक पुढे म्हणाले, जनता अधिकारी आणि लोकप्रतिनिधींकडून न्यायाची अपेक्षा करते. मात्र अधिकारी वर्गच अशापद्धतीने बेकायदेशीर गोष्टीत सहभागी असतील तर जनतेने न्यायासाठी कुणाकडे जावे? मोदगा गावातील सदर जागेच्या नोंदी येथील ग्रामस्थांकडे आहेत. गेल्या ६० वर्षांपासून मोदगा ग्रामस्थ आणि ग्रामपंचायत सदस्य या जागेसाठी लढत आहेत.
हि जागा महसूल विभागाच्या नोंदीत नासिर बागवान यांच्या मालकीची असल्याचे दर्शवत आहे तर धर्मादाय विभागानेही या मालमत्तेची नोंद आपल्याकडे असल्याचे सांगितले आहे.
त्यामुळे दोन्ही विभागात दोन वेगवेगळ्या नावावर असणाऱ्या या मालमत्तेत घोटाळेबाजी झाली असून सत्ता आणि अधिकारांचा गैरवापर करून बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली.