बेळगाव लाईव्ह:बेळगाव शहरासह जिल्ह्यात डेंग्यूचे रुग्ण वाढत आहेत या पार्श्वभूमीवर खासदार जगदीश शेट्टर यांनी आज सकाळी बीम्स हॉस्पिटल अर्थात सिव्हिल हॉस्पिटलला भेट देऊन रुग्णांची विचारपूस करण्याबरोबरच वैद्यकीय अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना केल्या.
शहर व जिल्ह्यातील डेंग्यू रुग्णाच्या संख्येत होत असलेल्या वाढीची गांभीर्याने दखल घेत बेळगावचे खासदार जगदीश शेट्टर यांनी आज मंगळवारी सकाळी सिव्हिल हॉस्पिटलला भेट दिली.
लोकसभा निवडणुकीनंतर खासदार शेट्टर पहिल्यांदाच भेट देत असल्यामुळे हॉस्पिटल प्रशासनाकडून त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. त्यानंतर खासदारांनी हॉस्पिटलचा पाहणी दौरा करताना उपचार घेत असलेल्या डेंग्यूग्रस्त रुग्णांची भेट घेतली.
खासदार शेट्टर यांनी संबंधित रुग्णांची आस्थेने विचारपूस करून त्यांच्या उपचारासंदर्भात वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून माहिती घेण्याबरोबरच आवश्यक सूचना केल्या.
बीम्स हॉस्पिटलला दिलेल्या भेटीप्रसंगी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना खासदार जगदीश शेट्टर यांनी राज्यासह बेळगाव शहर व जिल्ह्यात डेंग्यूचे रुग्ण वाढत असल्याचा अहवाल आहे. त्यासाठीच मी आज सिव्हिल हॉस्पिटलला भेट दिली आहे असे सांगितले.
या भेटी प्रसंगी मी माहिती जाणून घेतली असता जिल्हा आरोग्य अधिकारी व हॉस्पिटलच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी जिल्ह्यात डेंग्यूचे 177 रुग्ण आढळून आले आहेत. मात्र सिव्हिल हॉस्पिटलमध्ये 189 डेंग्यूग्रस्त रुग्णांवर उपचार सुरू असून यामध्ये महाराष्ट्र व गोवा राज्यातील रुग्णांचा समावेश असल्याची माहिती दिली आहे.
उपचार घेणाऱ्या रुग्णांपैकी कोणाच्याही जीविताला धोका नाही. तथापि डेंग्यू संदर्भात आवश्यक खबरदारी आणि डेंग्यू रुग्णांवर तात्काळ वैद्यकीय उपचार केले जावेत, अशी सूचना मी केली आहे.
डेंग्यूचे रुग्ण वाढत असले तरी वैद्यकीय आपत्कालीन परिस्थिती घोषित करण्यासारखी वेळ अद्याप आलेली नाही असे राज्याचे आरोग्य मंत्री दिनेश गुंडूराव यांनी स्पष्ट केले आहे. मात्र बेळगावमध्ये ती परिस्थिती येऊ नये यासाठी खबरदारी घेतली जावी अशी सक्त सूचना मी केली आहे. आरोग्य खाते सध्या डेंग्यूच्या संसर्गाला आळा घालण्यासाठी आवश्यक उपाययोजना करत आहे.
त्यात यश मिळत नसल्याचे दिसून आल्यास प्रत्येक तालुक्यात डेंग्यूला रोखण्यासाठी टास्क फोर्स स्थापन करण्याची मागणी मी करणार आहे. महाराष्ट्रातील झिका व्हायरसचा आपल्या भागात संसर्ग होऊ नये याबाबतीत खबरदारी घेण्याची सूचनाही मी करणार आहे.
मुख्यमंत्र्यांनी काल सर्व वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिलेला इशारा लक्षात घेता राज्यातील प्रशासकीय व्यवस्था पाऊस अतिवृष्टी सारख्या समस्या हाताळण्यात अपयशी ठरत असल्याचा आरोप यावेळी खासदार जगदीश शेट्टर केला.