बेळगाव लाईव्ह :माझ्या वडिलांनी संसदेत कामकाज कसं चालतं त्याचे निरीक्षण करून सध्या फक्त मला शिकायला सांगितलं आहे. त्यामुळे आता सुरुवातीला संसदेत बडे बडे नेते ज्या पद्धतीने आपले विचार मांडतात, वादविवाद करतात, त्याचे मी फक्त निरीक्षण करणार असून त्यानंतर अभ्यास करून संपूर्ण तयारीनिशी संसदेच्या सभागृहात माझा आवाज उठवणार आहे, अशी माहिती चिक्कोडीच्या खासदार प्रियांका जारकीहोळी यांनी दिली
चिक्कोडीच्या खासदार झाल्यानंतर आज सोमवारी सकाळी पहिल्यांदाच बेळगाव शहरात आयोजित पत्रकार परिषदेमध्ये त्या बोलत होत्या.
प्रारंभी त्यांनी खासदार म्हणून निवडून आल्यानंतर बेळगाव जिल्ह्यात आज पहिल्यांदाच झालेल्या भव्य -उस्फूर्त स्वागताबद्दल सर्वप्रथम पक्ष कार्यकर्ते व इतर सर्वांचे आभार मानले. आज आपण शहरातील सर्व महापुरुषांच्या स्मृतींना अभिवादन केले असून शहरासह जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते आणि लोकप्रतिनिधींची आपण भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेणार आहोत असा आजचा आपला कार्यक्रम असल्याचे खासदार प्रियांका जारकीहोळी यांनी सांगितले.
पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना देशाच्या संसदेतील आपला पहिला अनुभव खूपच चांगला होता. माझ्या वडिलांनी केलेल्या सूचनेनुसार मी आता सुरुवातीला संसदेत बडे बडे नेते कशा पद्धतीने आपले विचार मांडतात, कसे वादविवाद करतात, कोणते मुद्दे सभापतींसमोर मांडतात, या सर्व गोष्टींचे निरीक्षण व अभ्यास करणार आहे. त्यानंतर अभ्यास व संशोधन करून मी पूर्ण तयारीनिशी संसदेच्या सभागृहात माझा आवाज उठवणार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी मी सर्वात तरुण खासदार असल्याबद्दल इतर सर्व अनुभवी ज्येष्ठ खासदारांनी माझे अभिनंदन करून प्रशंसा केली. तसेच सर्वसामान्यपणे राजकीय नेते पस्तिशी -चाळीशी मध्ये खासदार बनतात, त्यामुळे माझ्यासारख्या तरुण खासदारांना राजकारणात उज्वल भविष्य असल्याचेही काही ज्येष्ठ खासदारांनी नमूद केले. इंडिया युतीच्या खासदारांमध्ये प्रामुख्याने महाराष्ट्रातील खासदार सुप्रिया सुळे यांची मी भेट घेतली. त्यावेळी त्यांनी देखील माझे कौतुक करून कांही मदत लागल्यास सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे, अशी माहिती खासदार प्रियांका जारकीहोळी यांनी दिली.
सकाळी प्रियंका यांनी नागनूर रुद्राक्षी मठ भेट दिली, डॉ बाबासाहेब आंबेडकर उद्यान, राणी चन्नम्मा चौक, धर्मवीर संभाजी महाराज चौक, बसवेश्वर सर्कल, छत्रपती शिवाजी महाराज उद्यान महापुरुषांच्या मूर्तींना हार अर्पण केला. याशिवाय पिरणवाडी येथे दर्गा भेट, संगोळी रायण्णा मूर्ती, छत्रपती शिवाजी महाराज मूर्ती आणि माजी आमदार परशुराम भाऊ नंदीहळळी, आणि विद्यमान आमदार असिफ शेठ यांच्या घरी भेट दिली.
दरम्यान काँग्रेस कार्यालयाला भेट दिली असता कार्यकर्त्याने त्यांचे पुष्प वृष्टी करत केले.छत्रपती शिवाजी महाराज उद्यान येथे माजी जिल्हा पंचायत सदस्य रमेश गोरल आणि येळळूर ग्रामपंचायतचे उपाध्यक्ष प्रमोद पाटील, सदस्य शिवाजी नांदूरकर माजी अध्यक्ष सतीश पाटील , आदींनी शुभेच्छा दिल्या.