बेळगाव लाईव्ह :झाडशहापूर ते होनगा राष्ट्रीय महामार्ग आणि बेळगाव रिंग रोड या प्रकल्पांसाठी आवश्यक भू-संपादनाची प्रक्रिया लवकरात लवकर पार पाडावी, अशी सूचना बेळगावचे खासदार जगदीश शेट्टर यांनी आज राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना दिली.
बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आज शनिवारी सकाळी खासदार जगदीश शेट्टर यांनी झाडशहापूर ते होनगा राष्ट्रीय महामार्ग आणि बेळगाव रिंग रोड संदर्भातील खर्च, विकास काम पूर्ण होण्यास लागणारा कालावधी वगैरे सर्व आवश्यक माहिती स्वतः जातीने जाणून घेत नमूद करून घेतली.
त्यानंतर त्यांनी या दोन्ही प्रकल्पाशी संबंधित भू-संपादनाची प्रक्रिया त्वरेने पूर्ण केली जावी अशी सूचना अधिकाऱ्यांना दिली.
याप्रसंगी नूतन जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांच्यासह राष्ट्रीय महामार्ग योजना संचालक भुवनेश्वर कुमार, राष्ट्रीय महामार्ग भूसंपादन अधिकारी बलराम चौहान यांच्यासह अरण्य व अन्य संबंधित खात्याचे अधिकारी उपस्थित होते.