स्मार्ट सिटीची माकडचेष्टा पाहणाऱ्या माकडांच्या मनातील प्रश्न…!

0
7
Monkeys disscussion
 belgaum

बेळगाव लाईव्ह : एकीकडॆ बेळगाव शहरात पावसाचे पाणी सुरळीत वाहून जात असल्याची प्रतिक्रिया नवनियुक्त जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी आजच्या पत्रकार परिषदेत दिली खरी. परंतु बहुतेक त्यांचा अंदाज चुकलेला असावा असेच बेळगावची परिस्थिती पाहून वाटते. एकीकडे स्मार्ट सिटीसाठी दोनवेळा पुरस्कार घेणारी बेळगावची स्मार्ट सिटी आणि दुसरीकडे विकासाच्या नावावर भकास झालेले बेळगाव! हा विरोधाभास कदाचित नवनियुक्त जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनात आलेला दिसत नाही.

मुसळधार पावसाने गेल्या चार दिवसांपासून विश्रांती घेतली नाही. पहिल्या पावसापासूनच बेळगावकरांची त्रेधातिरपीट उडाली असून आठवड्याभरापासून सुरु असलेल्या संततधार पावसामुळे बेळगावमधील अनेक ‘ब्लॉकेज’ आता ‘उघड’ झाले आहेत. पूर्व, पश्चिम, दक्षिण उत्तर अशा चारही विभागात पावसाचा रुद्रावतार दिसून येत असून पावसामुळे गटारी, नाले, नद्या ओसंडून वाहात आहेत. शहरवासीयांना सांडपाणी रस्त्यावर वाहत असल्याने दुर्गंधीतच राहण्याची वेळ आली आहे. ठिकठिकाणी कचऱ्यासहित गटारीत पाणी वाहत असल्याचे चित्र आहे. बेळगावची गणना स्मार्ट सिटी मध्ये करण्यात येऊनही हा सगळाच कारभार आता अनागोंदी वाटू लागला आहे.

एकीकडे कोट्यवधींचा जाहीर होणार निधी, निधीच्या माध्यमातून केली जाणारी विकास(?) कामे, पहिल्या पावसातच निघणारे विकासकामांचे वाभाडे! ड्रेनेज, रस्ते, गटारी यासारख्या मूलभूत सुविधांसाठी आंदोलने करणारे नागरिक याचा ताळमेळ आता स्मार्ट सिटीच्या कोणत्याच गोष्टीशी जमत नसल्याचे चित्र आहे.Monkeys disscussion

 belgaum

एकीकडे जनता या सर्व कारभाराविरोधात बोंबाबोंब करत आहे तर दुसरीकडे कानाचे पडदे पोलादाचे करून अधिकारी, लोकप्रतिनिधी आणि प्रशासन झोपेचे सोंग घेऊन बसल्याचे चित्र आहे. निवेदनांचा महापूर जिल्हा प्रशासनाच्या कार्यालयात एव्हाना धूळखात पडला असेल. परंतु केवळ आश्वासने देत आलेल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी आतापर्यंत जनतेच्या गैरसोयीसाठी कोणताही प्रतिसाद दिला नाही.

इकडे लोकप्रतिनिधींनी जनतेचा वापर केवळ निवडणुकीपुरताच केल्याचे दिसून येत आहे. केवळ आश्वासनांच्या खैरातीवरच जनतेला झुलवत ठेवणाऱ्या लोकप्रतिनिधी आणि राजकारण्यांनी विकासाच्या नावावर जनतेच्या तोंडाला पानेच पुसली.

शहराचा विकास करण्याऐवजी चोहोबाजूने शहर भकास केले. जनतेला आश्वासने देऊन ‘उल्लू बनाया.. बडा मजा आया…’! असे म्हणणाऱ्या राजकारण्यांकडे पाहून वर दिसणाऱ्या छायाचित्रातील स्मार्ट सिटीची माकडचेष्टा पाहणाऱ्या माकडांच्या मनात देखील ‘…ही अशी माणसांची माकडे झाली कशी’? हाच प्रश्न येत असेल!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.