बेळगाव लाईव्ह : गोवावेस येथे उभारण्यात आलेल्या खाऊ कट्ट्याच्या गाळा वाटपात भ्रष्टाचार झाल्याचे आरोप पुढे आल्यानंतर याप्रकरणी चौकशी आणि तपास सुरु करण्यात आला आहे. दरम्यान या प्रकरणी केएमसी कायदा-१९७६ कलम-२६(१)सी आणि केएमसी अधिनियम-१९७६ कलम- २६(१) (के) चे उल्लंघन केल्याप्रकरणी भाजपच्या दोन नगरसेवकांची चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती प्रादेशिक आयुक्त कार्यालयातून एका परिपत्रकाद्वारे जाहीर करण्यात आली आहे.
भाजपचे नगरसेवक जयंत जाधव आणि मंगेश पवार यांची खाऊ कट्टा याठिकाणी घेतलेल्या गळ्यासंदर्भात प्रादेशिक आयुक्तांच्या कार्यालयात चौकशी होणार आहे. खाऊ कट्ट्यामध्ये नगरसेवक पद असूनही दोघांच्या कुटुंबियांच्या नावे गेला घेतल्याचे समोर असल्याने यासंदर्भात प्रादेशिक आयुक्त कार्यालयात मंगळवार दि. २२ जुलै रोजी हि चौकशी होणार आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाने उभारलेल्या खाऊ कट्ट्यामध्ये कायद्यानुसार केवळ विधवा, गरीब आणि कर न भरणाऱ्यांना दुकाने वाटप करायची होती. मात्र, ही दुकाने केवळ भाजपशी संलग्न असलेल्या कार्यकर्त्यांना देण्यात आल्याचे आरोप आणि तक्रारी करण्यात आल्या. त्यामुळे या दाव्यांची चौकशी करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांचा समावेश असलेली समिती सरकारने स्थापन केली होती.
या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर नोव्हेंबर २०२३ साली अधिकाऱ्यांनी येथील प्रत्येक दुकानाची कसून तपासणी केली. यादरम्यान हि दुकाने एकाच्या नावावर नोंदणी केलेली असून दुसऱ्याच व्यक्तीकडून दुकाने चालवत असल्याचे समोर आले होते.
विशेष म्हणजे खाऊ कट्ट्याची दुकाने बांधण्यासाठी कंत्राट घेतलेल्या ठेकेदाराच्या पत्नीच्या नावावरही दुकाने असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे या दुकानांच्या वाटपासाठी वापरण्यात आलेल्या निकषांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. याप्रकरणी आता तपास आणि चौकशीची गती वाढविण्यात आली असून विविध निकष काढण्यात आल्याचे या परिपत्रकावरून स्पष्ट होत आहे.