बेळगाव लाईव्ह :बेळगाव शहरातील बसवेश्वर सर्कल, गोवावेस येथील वादग्रस्त खाऊ कट्टा भ्रष्टाचार प्रकरणी संबंधित दोन नगरसेवकांची आज सोमवारी होणारी चौकशी स्वतः प्रादेशिक आयुक्तच परगावी गेले असल्यामुळे पुढे ढकलण्यात आली आहे.
गोवावेस येथील खाऊ कट्टा भ्रष्टाचारा संदर्भात सामाजिक कार्यकर्ते सुजित मुळगुंद यांनी प्रादेशिक आयुक्तांकडे तक्रार केली होती. या प्रकरणीशी संबंधीत नगरसेवक जयंत जाधव व नगरसेवक मंगेश पवार यांची आज सोमवारी प्रादेशिक आयुक्तांसमोर चौकशी होणार होती. तथापी प्रादेशिक आयुक्त बेंगलोरला असल्याने आजची ही चौकशी स्थगिती करण्यात येऊन पुढे ढकलण्यात आली आहे.
यासंदर्भात आज बेळगाव प्रादेशिक आयुक्त कार्यालयाच्या ठिकाणी बेळगाव लाईव्हशी बोलताना सामाजिक कार्यकर्ते सुजित मुळगुंद यांनी सांगितले की, गोवावेस सर्कल येथील खाऊ कट्टा येथील दुकानांचे गाळे हे रस्त्यावर किरकोळ भाजीपाला, साहित्याची विक्री करणाऱ्या गोरगरीब, विधवा महिलांना व अनुसूचित जाती -जमातीच्या महिलांसाठी राखीव ठेवण्यात आले होते.
मात्र कांही नगरसेवकांनी राजकीय प्रभाव वापरून खाऊ कट्ट्यातील दुकानांचे गाळे हडपले आहेत. नगरसेवक जयंत जाधव यांच्या पत्नी गीता जयंत जाधव आणि नगरसेवक मंगेश पवार यांच्या पत्नी निता मंगेश पवार यांच्या नावावर हे गाळे घेण्यात आले आहेत.
नियमांचे उल्लंघन करून हे गाळे ताब्यात घेण्यात आले असल्यामुळे यासंदर्भात आम्ही प्रादेशिक आयुक्तांच्या कार्यालयाकडे तक्रार नोंदवली होती. तसेच हा प्रकल्प गोरगरीब अनुसूचित जाती -जमातीच्या महिला व विधवा महिलांसाठी असल्यामुळे त्यांच्या अधिकारावर गदा आणणाऱ्या या नगरसेवकांचे नगरसेवक पद रद्द करावे अशी मागणी केली होती.
प्रादेशिक आयुक्त कार्यालयात आज या दोन्ही नगरसेवकांना चौकशीसाठी बोलावले होते. तथापि सरकारी कामानिमित्त प्रादेशिक आयुक्त परगावी गेले असल्यामुळे शिरस्तेदार सतीश नाशिपुडी यांनी सदर चौकशी पुढे ढकलण्यात आल्याचे आम्हाला सांगितले आहे. तरी लवकरात लवकर ही चौकशी करून संबंधित लाभार्थींना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी मी करत आहे, असे सुजित मुळगुंद यांनी सांगितले.