बेळगाव लाईव्ह :सध्या पडत असलेल्या संततधार पावसामुळे टिळकवाडी तिसऱ्या रेल्वे गेटाजवळील खानापूर रोड या रस्त्याची खड्डे पडून संपूर्ण वाताहात झाली असून हे धोकादायक जीवघेणे खड्डे बुजून रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करण्याद्वारे तो सुरक्षित करावा, अशी जोरदार मागणी वाहन चालकांकडून केली जात आहे.
टिळकवाडी येथील तिसऱ्या रेल्वे गेट जवळ काँग्रेस रोडवरून डी मार्ट व उद्यमबागकडे जाणाऱ्या खानापूर रोड रस्त्यावर संततधार पाऊस आणि अवजड वाहतुकीमुळे मोठ्या प्रमाणात खड्डे निर्माण झाले आहेत. पावसाचे गढूळ आणि साचलेले हे खड्डे वाहन चालकांसाठी मनस्ताप देणारे ठरत आहेत.
ओव्हर ब्रिज खालील रस्त्याच्या वळणावर पडलेल्या या खड्ड्यांना चुकवत जाताना वाहन चालवताना विशेष करून दुचाकी वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. संथ गतीने वाहने हाकावी लागत असल्यामुळे रस्त्याचा हा भाग वाहतुकीस अडथळा निर्माण करणारा ठरत आहे.
याखेरीज पावसाचे गढूळ पाणी साचलेल्या खड्ड्यांच्या खोलीचा अंदाज न आल्यामुळे विशेष करून रात्रीच्या वेळी या ठिकाणी किरकोळ अपघात होण्याबरोबरच दुचाकी वाहनांचे नुकसान अथवा ती नादुरुस्त होण्याचे प्रकार घडत आहेत.
जवळच असलेल्या नेटिव्ह हॉटेल समोर रस्त्यावर पडलेला मोठा खड्डा तर एखाद्या गंभीर दुर्घटनेला निमंत्रण देणारा ठरत आहे. तरी लोकप्रतिनिधींसह महापालिकेच्या संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन तिसऱ्या रेल्वे गेट जवळील रस्त्यावर पडलेले खड्डे युद्ध पातळीवर बुजवून रस्ता वाहतुकीसाठी सुरक्षित करावा अशी जोरदार मागणी वाहन चालकांकडून केली जात आहे.