बेळगाव लाईव्ह : पावसाची गेल्या आठ दिवसांपासून सुरु असलेली संततधार, नदी नाल्यांच्या पाणीपातळीत झालेली वाढ यामुळे बेळगाव जिल्ह्यातील विविध तालुक्यात पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली असून बेळगाव जिल्ह्यातील वनपरिक्षेत्रातील खानापूर भागात सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे.
या भागातील नद्यांचे पाणी पात्राबाहेर पडत असून अनेक ब्रिज पाण्याखाली गेले आहेत. या भागात असणाऱ्या तब्बल १५ गावांचा संपर्क तुटण्याच्या मार्गावर असून सकाळपासून जरी पावसाने थोडी विश्रांती घेतली असली तरी सायंकाळी ४ नंतर पुन्हा सुरु झालेल्या पावसामुळे तसेच पश्चिम घाटात होत असलेल्या पावसामुळे नद्यांच्या पाणीपातळीत वाढ होण्याची पुन्हा शक्यता वर्तविण्यात येत आहे.
खानापूर तालुक्यातील निलावडे या भागाचा संपर्क तुटला असून या भागात असणाऱ्या मलप्रभा नदीवरील आंबोळी पूल पाण्याखाली गेला आहे. या पुलावर यापूर्वी २०१९ – २० साली झालेल्या अतिवृष्टीमुळे पाणी साचले होते. यामुळे तब्बल ८ दिवसांहून अधिक काळ हा पूल बंद होता.
खानापूरमधून वाहणाऱ्या मलप्रभा नदीने आता धोकादायक रूप धारण केले असून निलावडे गावासह हेममडगा, शिरोली, बांदेकरवाडा, कोकणवाडा, मुघवडे, कबनाळी या गावांची वाहतूक ठप्प झाली आहे. बेळगाव शहर आणि परिसरात जरी ८ दिवसांपासून पावसाचा जोर वाढला असला तरी खानापूर तालुक्यात मात्र गेल्या १५ दिवसांपासून पावसाची संततधार सुरूच आहे. खानापूर तालुक्यातील १५ गावांचा संपर्क तुटला असला तरीही काही भागांना असोगा मार्गे पर्यायी रस्त्याचा वापर करता येणार असून रामनगर, अनमोड़, चोर्ला मार्ग बंद करण्यात आल्याने पर्यायी मार्गावरून देखील वाहतूक वाढली आहे.या भागातून अवजड वाहनांना अतिवृष्टीमुळे बंदी घालण्यात आली असून केवळ लहान वाहनांना या भागातून संचार करण्याची परवानगी देण्यात आली आहे.
एकीकडे पावसाचा कहर सुरूच असून खानापूर तालुक्यातील कालमनी आणि हब्बनहट्टी येथील शेतामध्ये एका टस्कर हत्तीने धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत.या दोन्ही गावांसह परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
सदर टस्कर हत्तीने कालमनी व हब्बनहट्टी तेथील शेतामध्ये धुमाकूळ घालत ऊस व अन्य पिकांबरोबरच भातपिकाची नासधूस करण्यास सुरुवात केली आहे. पिकांची नासधूस होत असल्याने सदर टस्कर हत्तीचा वन खात्याने तात्काळ बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.
खानापूर तालुक्यात झालेल्या पावसाची नोंद : जांबोटी : 207 मिमी, लोंढा पीडब्ल्यूडी : 112.4, लोंढा रेल्वे स्टेशन : 118, खानापुर : 73, नागरगळी : 65.3, कक्केरी : 45.8, खानापुर मलप्रभा : 25.6 मि.मी..