बेळगाव लाईव्ह :खानापूर-जांबोटी मार्गावर नियंत्रण सुटलेल्या भरधाव कारने नाल्यावरील ब्रिजच्या संरक्षक कठड्याला जबरदस्त धडक दिल्यामुळे घडलेल्या भीषण अपघातात दोघेजण जागीच ठार, तर एक जण गंभीर व अन्य एक किरकोळ जखमी झाले आहेत. खानापूर -जांबोटी मार्गावरील शनया गार्डन नजीक (कुंभार होळ) मध्यरात्री रात्री 1 वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला.
अपघातात मच्छे येथील शंकर उर्फ मिथुन मोहन गोमानाचे (वय 25) व आशिष मोहन पाटील (वय 26, मुळगाव हत्तरवाड खानापूर, सध्या रा. मच्छे बेळगाव) हे दोघे जागीच ठार झाले.
अपघातग्रस्त कार मधील निकेश जयवंत पवार (वय 25, रा. मच्छे) याच्या पायाला गंभीर दुखापत झाली असून त्याला उपचारासाठी बेळगाव येथील खाजगी दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे.
या अपघातात दैव बलवत्तर म्हणून चालकाच्या बाजूला बसलेला जोतिबा गोवींद गांवकर (वय 27, रा. मच्छे) हा किरकोळ जखमी झाला आहे. याबाबत समजलेली माहिती अशी की, मच्छे -बेळगाव येथील चौघेजण काल बुधवारी रात्री खानापूर येथील हॉटेलमध्ये जेवणासाठी आले होते. जेवण झाल्यानंतर जांबोटीकडे जात असताना चालकाचे कार वरील नियंत्रण सुटले.
परिणामी शनया गार्डन नजीक असलेल्या (कुंभार होळ) नाल्यावरील ब्रिजच्या संरक्षक कठड्याला कारने अतिवेगाने धडक दिली. ही धडक इतकी जबरदस्त होती की कारचा चक्काचूर झाला आहे. कारचे इंजिन निखळून खाली पडले होते. तसेच कारचे चाक एकीकडे आणि रेडिएटर दुसरीकडे पडला होता. कठड्याला धडक दिल्यानंतर कार अंदाजे 100 मीटर वर पलटी झाली होती. सदर अपघाताची नोंद खानापूर पोलीस स्थानकात झाली असून पुढील तपास सुरू आहे.
अपघातात ठार झालेल्या दोघांचे मृतदेह खानापूर येथील सार्वजनिक सरकारी दवाखान्यात आणण्यात आले असून शवचिकित्सेनंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येणार आहेत.
या अपघातातील मयत शंकर उर्फ मिथुन गोमानाचे आणि किरकोळ जखमी झालेला जोतिबा गांवकर हे दोघं मावस भाऊ आहेत. तसेच पायाला गंभीर इजा झालेला निकेश जयवंत पवार हा त्यांचा मामे भाऊ असल्याचे समजते.