बेळगाव लाईव्ह :चिक्कोडी येथे उभारण्यात आलेल्या माता -शिशु हॉस्पिटल येत्या 15 ऑगस्ट रोजी लोकार्पण होण्याच्या दृष्टीने तात्काळ आवश्यक क्रम घेतले जावेत, अशी सूचना जिल्हा पालकमंत्री सतीश जारकी होळी यांनी आरोग्य खात्याच्या अधिकाऱ्यांना केली.
बेळगावच्या सुवर्ण विधानसौध येथे आज शुक्रवारी सकाळी पार पडलेल्या 2024 -25 सालातील पहिल्या कर्नाटक विकास कार्यक्रम (केडीपी) बैठकीच्या अध्यक्ष स्थानावरून मंत्री जारकीहोळी बोलत होते. चिक्कोडी येथील माता-शिशु हॉस्पिटलच्या इमारतीचे बांधकाम नुकतेच पूर्ण होऊन त्या ठिकाणी डॉक्टर्स आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांचीही नियुक्ती झाली असल्यामुळे या हॉस्पिटलचे येत्या 15 ऑगस्ट रोजी उद्घाटन करण्याच्या दृष्टीने तयारी केली जावी, असे त्यांनी सांगितले.
सर्वसामान्य जनतेला उत्तम वैद्यकीय सुविधा मिळावी यासाठी उभारण्यात आलेल्या बेळगावच्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल मधील अत्याधुनिक वैद्यकीय यंत्र उपकरणे त्वरेने सार्वजनिकांसाठी उपलब्ध केली जावीत. संपूर्ण राज्यात डेंग्यू तापाचे रुग्ण वाढत असल्यामुळे आपल्या जिल्ह्यात डेंग्यूचा ताप नियंत्रणात आणण्यासाठी आवश्यक उपाययोजना हाती घेतल्या जाव्यात. जिल्ह्यातील सर्व हॉस्पिटल्सना डेंग्यू चांचणी किट्सचे वितरण केले जावे.
एवढेच नव्हे तर डेंग्यू तापाची लक्षणे आढळणाऱ्या रुग्णांवर तात्काळ उपचार करण्याबरोबरच त्यांच्यासाठी या तापावरील औषधे देखील उपलब्ध करून दिली जावीत. डेंग्यू तापाची लक्षणे, तो होऊ नये म्हणून घ्यावयाची खबरदारी वगैरे संबंधित सर्व गोष्टींबाबत मोठ्या प्रमाणात जनजागृती केली जावी अशी सूचना पालकमंत्री जारकीहोळी यांनी आरोग्य खात्याच्या अधिकाऱ्यांना केली.
तात्काळ डेस्क खरेदीची मंत्र्यांची सूचना : डेस्क खरेदीसाठी उपलब्ध असलेल्या अनुदानाचा व्यवस्थित विनियोग करून जिल्ह्यातील गरजू शाळांना डेस्कचे वितरण केले जावे अशी सूचना जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी शिक्षण खात्याच्या अधिकाऱ्यांना केली. शैक्षणिक प्रगतीसाठी लवकरच बेळगाव आणि चिक्कोडी शैक्षणिक जिल्ह्यांसाठी शाळा शिक्षण खात्याच्या उपसंचालकाची नियुक्ती केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.
यंदा मान्सूनचा पाऊस चांगला झाला आहे त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बियाणं आणि खतांचा वेळच्यावेळी पुरवठा केला जावा. जिल्ह्यातील आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना लवकरात लवकर नुकसान भरपाई दिली गेली पाहिजे. जिल्ह्यामध्ये हाती घेण्यात आलेल्या जलजीवन मिशन योजनेअंतर्गत अर्धवट कामे त्वरित पूर्ण करून समर्पक पाणीपुरवठा होण्याच्या दृष्टीने पावले उचलली जावीत, असे त्यांनी सांगितले. तसेच जिल्ह्यात नव्याने स्थापन केल्या जाणाऱ्या वीज वितरण केंद्रासंदर्भात वीज मंडळाच्या अधिकाऱ्यांकडून माहिती जाणून घेऊन सदर नव्या केंद्रासाठी आवश्यक योग्य जागा निश्चित करण्यासाठी आवश्यक क्रम तात्काळ हाती घेतले जावेत. त्याचप्रमाणे शेतकऱ्यांची गैरसोय होऊ नये यासाठी नादुरुस्त विद्युत ट्रान्सफॉर्मर्स तात्काळ बदलण्यात यावेत अशी सूचना पालकमंत्र्यांनी केली.
रायबाग तालुक्यातील तलाव भरण्याचे कार्य त्वरेने पूर्ण केले जावे. स्थानिक आमदारांची समन्वय साधून हे कार्य करण्यात यावे आणि यासाठी रायबागमध्ये त्वरित बैठक घेतली जावी. जवळच्या महाराष्ट्र राज्यात जास्त पाऊस होत असल्यामुळे जिल्ह्यातील नद्यांची पाणी पातळी वाढवून जवळच्या गावाला धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याने नदीच्या प्रवाहावर बारीक लक्ष ठेवले जावे. त्याचप्रमाणे यासंदर्भात सार्वजनिकांना खबरदारीच्या उपायासंदर्भात जागरूक केले जावे, अशी सूचना मंत्र्यांनी केली.
कर्नाटक सरकारचे दिल्ली विशेष प्रतिनिधी -2 प्रकाश हुक्केरी, वायव्य परिवहन संस्थेचे अध्यक्ष भरमगौडा (राजू) कागे, राज्यसभा सदस्य इराण्णा कडाडी, बेळगाव उत्तरचे आमदार असिफ (राजू) सेठ, विधान परिषद सदस्य नागराज यादव आदींनी देखील बैठकीत कांही मौलिक सूचना केल्या.
जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी डेंग्यू रुग्णांची संख्या त्यांच्यासाठी उपलब्ध करण्यात आलेली आरोग्य सुविधा आणि डेंग्यूला आळा घालण्यासाठी हाती घेण्यात आलेल्या उपाययोजना याबद्दल माहिती दिली. आजच्या केडीपी बैठकीस खासदार प्रियांका जारकीहोळी, शहर पोलीस आयुक्त यडा मार्टिन मार्बन्यांग, जि. पं. मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे, जिल्हा पोलीस प्रमुख डॉ भीमाशंकर गुळेद, विधान सभा व विधान परिषदेचे सदस्य, नामनिर्दिष्ट सदस्य आणि विविध खात्यांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.