बेळगाव लाईव्ह :कडोली येथील एका असहाय्य मतिमंद युवतीवर घरात घुसून अत्याचार करण्याचा प्रयत्न करणाऱ्या नराधमाला कोणत्याही राजकीय दबावाला न बळी पडता कठोर शिक्षा दिली जावी, अशी मागणी संतप्त कडोलीवासीयांनी आज एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
बेळगाव तालुक्यातील कडोली गावामध्ये घरात कोणी नसल्याचे पाहून असहाय्य मतिमंद युवतीवर एका नराधमाने बळजबरी करण्याचा प्रयत्न केल्याची निंद्य घटना काल बुधवारी दुपारी घडल्यानंतर गावात संतापाची लाट उसळली आहे. या पार्श्वभूमीवर संतप्त कडोलीवासीय आज गुरुवारी सकाळी मोठ्या संख्येने जिल्हाधिकारी कार्यालयात आवारात जमले होते. जमलेल्या गावकऱ्यांमध्ये महिलावर्ग, गृहिणींची संख्या लक्षणीय होती.
याप्रसंगी गावकऱ्यांच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांना उपरोक्त मागणीचे निवेदन सादर करण्यात आले. जिल्हाधिकाऱ्यांच्या सहाय्यकांनी निवेदनाचा स्वीकार करून त्वरित योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे. यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना घटनेची थोडक्यात माहिती देऊन गावातील प्रमुखांपैकी एकानी गावकऱ्यांच्यावतीने घडलेल्या निंद्य घटनेचा तीव्र निषेध केला. तसेच सदर घटनेतील पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या दोषीवर कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता कठोर कारवाई केली जावी अशी मागणी केली.
तसेच माहिती मिळताच तात्काळ कडोली गावात दाखल होऊन आरोपीला ताब्यात घेणाऱ्या काकती पोलिसांचे अभिनंदन केले. यापूर्वी आरोपी आणि आरोपीच्या धामणेकर कुटुंबीयांकडून गावात अनेक अन्यायकारक घटना घडल्या आहेत. युवतीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीला यापूर्वी खुनाच्या गुन्ह्याखाली शिक्षाही झाली आहे.
गावातील मुस्लिम समाजाने देखील या धामणेकर कुटुंबीयांवर आपल्या जमातीमधून बहिष्कार घातला आहे कारण हे कुटुंब मुस्लिम समाज आणि गावाच्या नियमानुसार वागत नाही. तेंव्हा आम्हा समस्त कडोलीवासीयांची मागणी आहे की आरोपीसह या धामणेकर कुटुंबावर कठोर कारवाई केली जावी आणि शासनाला विनंती आहे की काल घडलेल्या घटनेत जो दोषी आहे त्याच्या बाबतीत कोणतीही दया दाखवली जाऊ नये, असेही त्यांनी अधिकाऱ्यांसमोर स्पष्ट केले.
जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आलेल्या निवेदनात आरोपी समीर अब्बास धामणेकर याच्या नावासह त्याने गावातील मतिमंद मुलीच्या बाबतीत केलेल्या नींदे प्रकाराची माहिती नमूद आहे. त्याचप्रमाणे त्याच्यासह धामणकर कुटुंबीयांवर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी कार्यालय आवारात प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना म. ए. समितीचे नेते रमाकांत कोंडुसकर यांनी कडोली गावातील स्वतःबद्दल आणि समाजाबद्दल जाणीव नसलेल्या असहाय्य मतिमंद मुलीवर काल दुपारी एक मुस्लिम युवक घरात घुसून अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करतो हे अतिशय निंदनीय आहे, असे सांगितले.
यापूर्वीही अशाच प्रकारची घटना त्या ठिकाणी घडली आहे. जर त्यावेळी वेळीच संबंधित आरोपीला कठोर शिक्षा झाली असती तर कालचा प्रकार घडला नसता. यासाठी माझी जिल्हाधिकारी आणि प्रशासनाला विनंती आहे की कालचे निंद्य कृत्य ज्यांनी केले आहे त्याची सखोल चौकशी करून त्याला कठोर शिक्षा केली जावी पोलिसांकडून गुन्हा नोंदवला गेला असल्याचे सांगितले जात असले तरी फक्त गुन्हा नोंदवून चालणार नाही. पोलिसांनी असे सबळ दोषारोपपत्र तयार केले पाहिजे की दोषीला शिक्षा ही झालीच पाहिजे.
माझी वकील संघटनेला देखील विनंती आहे त्या नराधमाचे जामिनासाठी त्याचे वकीलपत्र कोणीही घेऊ नये कारण वकिलांनी अशा नराधमांची जर जामिनावर मुक्तता केली तर कडोली सारखे प्रकार वरचेवर घडत राहणार आणि एखाद्या वकिलाच्या मुलीला देखील त्याची झळ बसणार हे निश्चित आहे तेंव्हा कोणत्याही वकिलाने त्या नराधमाचे वकील पत्र स्वीकारू नये जर तसे झाल्यास त्या वकिला विरुद्ध आवाज उठविला जाईल, असा इशारा कोंडुसकर यांनी दिला.