बेळगाव लाईव्ह :मुसळधार पावसामुळे कडोली (ता. जि. बेळगाव) येथील तुडुंब भरलेला वाघमारी तलाव 4 वर्षानंतर दुसऱ्यांदा फुटल्याची घटना आज रविवारी सकाळी 7 -7:15 वाजण्याच्या सुमारास घडली.
फुटलेल्या तलावाचे पाणी शेत जमिनीत घुसल्यामुळे लाखो रुपयांचे भात पीक नष्ट झाले असून कडोली -गुंजी रस्ता तलावाच्या पाण्याखाली गेल्याने या मार्गावरील वाहतूक सकाळी कांही काळ ठप्प झाली होती.
गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेल्या पावसाच्या कहरामुळे कडोली (ता. जि. बेळगाव) येथील तुडुंब भरलेला वाघमारी तलाव आज रविवारी सकाळी अचानक फुटला. फुटलेल्या तलावाच्या पाण्याचा प्रचंड मोठा लोट शेजारील शेत जमिनीत शिरल्याने सुमारे 35 एकर मधील लावणी केलेले भात पीक नष्ट होऊन शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. शेताप्रमाणे लगतच्या दोन घरांमध्ये देखील तलावाचे पाणी घुसली होते. यापूर्वी 2019 मध्ये हा वाघमारी तलाव पहिल्यांदा फुटला होता. तलावाच्या ओव्हर फ्लो होणाऱ्या पाण्याचा निचरा होण्यासाठी जागाच नसल्यामुळे यंदा आज सकाळी 7 -7:15 वाजण्याच्या सुमारास हा तलाव दुसऱ्यांदा फुटला. याबाबतची माहिती मिळताच कडोली ग्रा.पं. अध्यक्ष सागर पाटील, ग्रा.प. सदस्य व गावातील प्रमुख नागरिकांनी तलावाकडे धाव घेऊन पाहणी केली. तसेच घटनेची माहिती तलाठ्यांना दिली. तलाव फुटून त्याचे पाणी शेतात शिरल्याची बातमी वाऱ्यासारखी गावात पसरताच घटनास्थळी गावकऱ्यांची गर्दी झाली होती. कांही उत्साही तरुणांनी आपल्या मोबाईलवर फुटलेला तलाव, त्याचे धो धो वाहणारे पाणी, जलमय झालेली शेत जमीन यांचा व्हिडिओ काढून तो सोशल मीडियावर व्हायरल केला.
कडोली येथील वाघमारी तलाव सुमारे 24 एकर इतक्या क्षेत्रात पसरलेला आहे. पावसामुळे तुडुंब भरलेला इतका मोठा तलाव सकाळी अचानक फुटल्यामुळे आसपासचा परिसर जलमय झाला. शेतजमीन पाण्याखाली जाण्याबरोबरच सकाळी 7:30 वाजण्याच्या सुमारास होळी कामान्नाकडे जाणारा कडोली -गुंजी रस्त्यावर देखील पाणी आले होते.
सदर रस्त्यावर सुमारे तीन ते चार फूट पाणी आल्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून दोन्ही बाजूची वाहतूक रोखून हा रस्ता वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला होता. या कामी ग्रामपंचायत अध्यक्ष सागर पाटील आणि पोलीस प्रशासनाने पुढाकार घेतला होता. रस्ता बंद झाल्यामुळे वाहन चालकांना अन्य मार्गांचा पर्याय अवलंबून आला. त्यानंतर सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास पाणी ओसरताच रस्त्यावर आणि कडेला साचलेला गाळ, केरकचरा जेसीबीच्या सहाय्याने काढून सदर रस्ता वाहतुकीस खुला करण्यात आला.
कडोलीचा तलाव फुटल्याची माहिती मिळताच तलाठी अरिफ मुल्ला, तसेच जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांचे स्वीय सहाय्यक मलगौडा पाटील यांनी तात्काळ घटनास्थळी भेट दिली. यावेळी पाहणीअंती तलाठी मुल्ला यांनी पाऊस थोडा कमी होऊन पाणी ओसरताच आपण नुकसान भरपाईचे सर्वेक्षण करू असे आश्वासन दिले.
त्याचप्रमाणे मलगौडा पाटील यांनी सरकारकडून सर्वतोपरी सहाय्य मिळवून देण्याचे आश्वासन दिले. याप्रसंगी ग्रा. पं अध्यक्ष सागर पाटील, उपाध्यक्ष दीपक मरगाळे, गौडाप्पा पाटील, शंकर चिंचनगे आदींसह गावकरी उपस्थित होते.