बेळगाव लाईव्ह :हुक्केरी जवळील हेब्बाळ गावानजीकच्या हिरण्यकेशी नदीचे पाणी रस्त्यावर आल्यामुळे राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूकीचा खोळंबा झाल्याची घटना आज सकाळी घडली. मात्र त्यानंतर मातीचा भराव टाकून हा मार्ग वाहतुकीसाठी तात्पुरता सुलभ करण्यात आला.
गेल्या पाच-सहा दिवसांपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे सर्व नदी नाल्यांप्रमाणे हिरण्यकेशी नदीचे पाणी हुक्केरी जवळील हेब्बाळ गावानजीक पात्राबाहेर पडले आहे. परिणामी लगतचा राष्ट्रीय महामार्ग नदीच्या पाण्याखाली गेला.
त्यामुळे सदर मार्गावर अतिशय संथ गतीने वाहतूक सुरू होती. रस्ता पाण्याखाली गेल्याची माहिती मिळताच स्थानिक पोलीसांसह सार्वजनिक बांधकाम आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.
तसेच रस्ता वाहतुकीस सुलभ करण्याच्या दृष्टीने साचलेल्या पाण्यामध्ये मातीचा भराव टाकण्याचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले.
यावेळी डंपरद्वारे आणलेली माती रस्त्यावरील पाण्यात टाकून ती पोकलेनच्या सहाय्याने पसरवली जात होती. या पद्धतीने सदर मार्ग वाहतुकीसाठी तात्पुरता सुरळीत करण्यात आला.