Tuesday, January 28, 2025

/

अतिवृष्टीमुळे हेस्कॉमला कोट्यवधींचा फटका

 belgaum

बेळगाव लाईव्ह : २२ जुलै पासून बेळगाव जिल्ह्यात सुरु झालेल्या मुसळधार पावसासह सोसाट्याच्या वाऱ्यामुळे धोकादायक वृक्ष तसेच फांद्या पडून अनेक ठिकाणी विद्युत वाहिन्या आणि वीजखांबांची पडझड झाली. तसेच काँक्रिटचे खांब मोडल्याने अनेक भागातील वीजपुरवठा बंद करावा लागला.

जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे हेस्कॉमला कोट्यवधींचा फटका बसला असून हेस्कॉमच्या झालेल्या एकूण नुकसानापैकी ८० टक्के नुकसान हे धोकादायक वृक्षांमुळे झाले आहे.

हेस्कॉमच्या बेळगाव विभागात ३०१ विद्युत खांब, ७० ट्रान्स्फॉर्मर, ४४ कि. मी. लांबीची विद्युत वाहिनी निकामी झाली. खानापूरमध्ये २७४ विद्युत खांब, २३ ट्रान्स्फॉर्मर व २२ कि. मी. चे विद्युत वाहिनीचे नुकसान झाले. याबरोबर सौंदत्ती, कित्तूर, बैलहोंगल, गोकाक, मुडलगी व रामदुर्ग या तालुक्यांमध्येही हेस्कॉमचे मोठे नुकसान झाले आहे. चिकोडी विभागातील ५१ विद्युत खांब, ५९ ट्रान्स्फॉर्मर, निपाणी विभागात ४० ट्रान्स्फॉर्मर, ७२ विद्युत खांब, अथणीमध्ये ६ ट्रान्स्फॉर्मर, ६१ विद्युत खांब, रायबागमध्ये 4 ट्रान्स्फॉर्मरचे नुकसान झाले आहे.

 belgaum

त्यामुळे जिल्ह्यात २९०० विद्युत खांबांचे नुकसान झाले असून ४८९ ट्रान्स्फॉर्मर निकामी झाले आहेत. तर १०७ कि. मी. लांबीच्या विद्युत वाहिनीचे नुकसान झाले. एकूण १० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याची नोंद हेस्कॉमकडे झाली आहे. केवळ आठ दिवसांमध्ये वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने हेस्कॉमचे अंदाजे १० कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. विद्युत खांब कोसळणे, ट्रान्स्फॉर्मर निकामी होणे, विद्युत वाहिन्या तुटणे यामुळे मोठा फटका हेस्कॉमला बसला आहे.

पडलेल्या २९६२ विद्युत खांबांपैकी २८५० विद्युत खांब दूर करून त्याठिकाणी दुसरे विद्युत खांब तातडीने बसविले जात असून पुराच्या पाण्यामध्ये अडकलेल्या खांबांची दुरुस्ती होणे अद्याप बाकी आहे. ४८९ ट्रान्स्फॉर्मर तसेच तुटलेल्या विद्युत वाहिन्या नव्याने बदलण्यात आल्या आहेत.

त्यामुळे जिल्ह्यात पुन्हा सुरळीत वीजपुरवठा केला जात आहे. ग्राहकांची गैरसोय होऊ नये यासाठी विद्युत खांब तातडीने बदलले जात आहेत अशी माहिती हेस्कॉमचे अधीक्षक अभियंता प्रवीणकुमार चिकाडे यांनी दिली.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.